निसर्गात पर्यावरणाच्या दृष्टीने व भारतीय संस्कृतीमध्ये वडाच्या झाडाला अनन्यसाधारण महत्त्व -पै. नाना डोंगरे
नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे वटपौर्णिमेनिमित्त महिलांनी वडाच्या झाडाची लागवड करुन त्याचे पूजन करुन वटपौर्णिमा साजरी केली. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. तर सात ही जन्मात हाच पती मिळो, व पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली.
स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने मागील अकरा वर्षांपासून वटपौर्णिमेला महिलांच्या हस्ते वडाच्या झाडाची लागवड करण्याचा उपक्रम सातत्याने सुरु आहे. तर गावात विविध ठिकाणी लावलेल्या झाडांचे संवर्धन झाले असून, वडाच्या झाडाच्या सावलीत गृहिणींनी वटपौर्णिमा साजरी केली.
गावातील डोंगरे वस्ती येथे झालेल्या वृक्षारोपणाप्रसंगी संगिता डोंगरे, राधिका डोंगरे, विद्या डोंगरे, मंदाताई डोंगरे, अश्विनी डोंगरे, योगिता डोंगरे, भिमाबाई येणारे, चंद्रकला येणारे, कविता येणारे आदी महिला उपस्थित होत्या.
पै.नाना डोंगरे म्हणाले की, निसर्गात पर्यावरणाच्या दृष्टीने व भारतीय संस्कृतीमध्ये वडाच्या झाडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वाढत्या शहरीकरणामुळे हे झाड लुप्त होत असताना त्याची मोठ्या प्रमाणात लागवड होण्याची गरज आहे. गाव हरित व सुंदर बनविण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून कार्य सुरु असून, यासाठी लोकसहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.