वडाच्या वृक्षारोपणातून पर्यावरण व संस्कृतीचे अनोखे संगम
प्रशिक्षण आणि सण एकत्र साजरा करत महिलांनी दाखवली कल्पकता
नगर (प्रतिनिधी)- राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट), संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने पारनेर तालुक्यातील सुपा येथे वरिष्ठ वेतन श्रेणीचे प्रशिक्षण सध्या सुरु आहे. प्रशिक्षणाच्या व्यस्त वेळापत्रकातही महिलांनी वटपौर्णिमेसारखा पारंपरिक सण वडाच्या झाडाची लागवड करुन पर्यावरणस्नेही पद्धतीने साजरा केला.
वटपौर्णिमेच्या दिवशी प्रशिक्षणार्थी महिला शिक्षकांनी सुपा येथील प्रशिक्षण केंद्राच्या आवारात वडाच्या झाडांची रोपं लावून त्यांचे पूजन केले. पारंपरिक पद्धतीने पूजन करत सणाच्या निमित्ताने वृक्षारोपणासह पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला.
महिला प्रशिक्षणार्थींनी या सणासाठी विशेष सुट्टीची मागणी केली होती. मात्र प्रशिक्षणाचे वेळापत्रक लक्षात घेता कोणताही खंड न पडू देता प्रशिक्षणस्थळीच सण साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. वरिष्ठ वेतन श्रेणीच्या प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थींना पूर्णवेळ उपस्थित राहून, प्रत्येक तासिकेला उपस्थितीची स्वाक्षरी अनिवार्य असल्याने सदर प्रशिक्षणातील शिक्षक महिलांनी सण व प्रशिक्षण एकाचवेळी साध्य केले
संगमनेरचे डायट प्राचार्य डॉ. राजेश बनकर यांच्या हस्ते वडाचे झाड लावून महिलांनी त्याचे पूजन करुन वटपौर्णिमा साजरी केली. यावेळी प्रशिक्षणार्थी सीमा व्यवहारे, सुवर्णा भोर, पूनम निमसे, शितल राऊत, जयश्री भुतकर, वर्षा शिंदे, स्वाती कोल्हे, मनिषा जगदाळे, तहेसीन शेख, प्रशिक्षण तज्ज्ञ सुलभक विशाल पाचारणे, ज्ञानेश्वर इंगळे, प्रवीणचंद्र गुंजाळ, सतीश चव्हाण, न्यू इंग्लिश स्कूल सुपाचे प्राचार्य मंगेश जाधव, डायटचे वरिष्ठ अधिव्याख्याता व प्रशिक्षणाचे केंद्र संचालक लक्ष्मण सुपे उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. राजेश बनकर म्हणाले की, परंपरा आणि पर्यावरणाचा संगम करत महिलांनी वटपौर्णिमेला अनोखी दिशा दिली आहे. ही फक्त सण साजरा करण्याची कृती नव्हे, तर प्रशिक्षणासोबत मूल्यांची जपणूकही आहे. वडाचे झाड आपल्या संस्कृतीत पवित्र मानले गेले आहे. हे झाड लावताना महिलांनी पर्यावरणाचे भानही ठेवले, ही बाब स्तुत्य आहे. शिक्षिका हे केवळ विद्यार्थ्यांचे शिक्षणकर्ते नाहीत, तर समाजाला दिशा देणारे नेतृत्व असल्याचे त्यांनी सांगितले.
मा. संपादक कृपया प्रसिध्दीसाठी……………….