सेवानिवृत वनमजुरांचे भांडेवाडीला वृक्षारोपण
कर्जत-जामखेड वनक्षेत्रातील वन मजूरांच्या सेवापूर्तीचा अनोखा सोहळा!
नगर (प्रतिनिधी)- जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सेवानिवृत्त होत असलेल्या वनमजुरांनी भांडेवाडी (ता. कर्जत) या निसर्गरम्य परिसरात वृक्षारोपण केले. वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देवून हा सेवापूर्तीचा कार्यक्रम रंगला होता.
कर्जत-जामखेड वनक्षेत्रातील वन मजूरांचा यावेळी सन्मान करण्यात आला. वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके व कर्मचारी वर्ग यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जामखेड वनविभागामध्ये गेल्या 35 ते 40 वर्षापासून ज्या वनमजुरांनी प्रामाणिकपणे काम केलं अशा 5 वनमजुरांचा सेवापूर्तीचा सोहळा पार पडला. यामध्ये
सेवानिवृत्त वनकर्मचारी ताहेर अली सय्यद, बापू उमराव जायभाय, अशोक नामदेव काकडे, श्रीमती अन्नपूर्णा पवार, शंकर सोपान बाराते यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. वनमजुर देखील वन विभागाने राबविलेल्या सेवापूर्तीच्या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाने भारावले.
पर्यावरणाला वाचवण्यासाठी वन मजूर मोठी भूमिका बजावत आहेत, 2010 पासून वनमजुरांची भरती रखडलेली आहे. सेवेत असलेल्या वनमजुरांना त्यामुळे कामाचा मोठा ताण येत आहे. म्हणून ही भरती लवकरात लवकर करावी, जेणेकरून वनमजुरांना हातभार लागेल आणि पर्यावरण संवर्धनासाठी आणखी मोठे काम करता येईल, अशी मागणी वन मजुरांनी केली.
या कार्यक्रमासाठी सातत्याने पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या कृष्णाली फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले होते. कृष्णाली फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत पाटील शेळके वनमजुरांचा वृक्षारोपणाने झालेली सेवानिवृत्तीचा कार्यक्रम प्रेरणादायी आहे. आपल्या सेवाकाळात पर्यावरण रक्षणाचे काम केलेले वनमजुर वृक्षारोपणाने सेवानिवृत्त होत असल्याचा त्यांना देखील अभिमान राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जामखेड वनपाल प्रवीण उबाळे, कर्जत वनपाल सुरेश भोसले, वनरक्षक रवी राठोड, वनरक्षक शांतिनाथ सपकाळ, वनरक्षक नागेश तेलंगे, वनरक्षक गंगासागर गोटमुकले, वनरक्षक चित्रा आदींसह कार्यालयातील किसन नजन, शिवाजी चिलगर, श्यामराव डोंगरे, विठ्ठल जान गवळी, राघू सुरवसे आदी वनकर्मचारी उपस्थित होते.