हिंदू बांधवांनी गावातील मुस्लिम समाजाला दिल्या ईदच्या शुभेच्छा
सुफी-संतांच्या पावन भूमीत जात, धर्म व पंथाचा भेदभाव होत नसून, माणुसकी हाच धर्म -पै. नाना डोंगरे
नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे बकरी ईद (ईद उल अजहा) उत्साहात साजरी करण्यात आली. ईद निमित्त हिंदू बांधवांनी गावातील मुस्लिम समाजाला शुभेच्छा देऊन धार्मिक ऐक्याचे दर्शन घडविले. गावात सकाळी मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज पठण करुन गावाच्या सुख, शांती व समृध्दीसाठी प्रार्थना केली.
श्री नवनाथ युवा मंडळ, स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, एकता फाऊंडेशन व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, एकता फाऊंडेशनचे अध्यक्ष अतुल फलके, मुख्याध्यापक आदम शेख, प्राथमिक शिक्षक हुसेन शेख, रऊफ शेख, साहिल शेख, उद्योजक दिलावर शेख, मुराद शेख, सचिन जाधव, हारुन शेख, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, मोईन शेख, अनिस शेख, अरबाज शेख, साद शेख आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
सकाळी 9 वाजता गावात ईदची नमाज मौलाना इलियास यांच्या मार्गदर्शनाखाली पठण करण्यात आली. पै.नाना डोंगरे म्हणाले की, पुरोगामी महाराष्ट्रात सर्व धर्मिय गुण्यागोविंदाने नादतात, ही आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख आहे. सर्व हिंदू-मुस्लिम समाज बांधव एकमेकांच्या सण-उत्सवात सहभागी होत असतात. सुफी-संतांच्या पावन भूमीत जात, धर्म व पंथाचा भेदभाव होत नाही. माणुसकी हाच खरा धर्म असल्याचे त्यांनी सांगितले.