• Wed. Jul 2nd, 2025

पारनेरचा चेतन रेपाळे ठरला देवाभाऊ केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता

ByMirror

Jun 7, 2025

शेवटच्या क्षणी 2 गुणांची कमाई करुन विजय संपादन

नगर (प्रतिनिधी)- शेवगाव येथे अहिल्यानगर जिल्हा तालीम संघ, शेवगाव तालुका तालीम संघ आणि वंदे मातरम क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या देवाभाऊ केसरी कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद पारनेर येथील कुस्तीपटू चेतन रेपाळे याने दोन गुणांनी विजय संपादन केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या मल्लास चांदीची गदा व रोख बक्षीस देण्यात आले.


खुल्या गटातील अंतिम सामना चेतन रेपाळे (पारनेर) विरुध्द कौतुक डफडे (पुणे) यांच्यात अत्यंत चुरशीचा झाला. तोडीस तोड बलदंड मल्ल एकमेकांना भिडले होते. सहा मिनीटाच्या कुस्तीत पहिल्या तीन मिनीटाच्या राऊंडमध्ये कौतुक डफडेने 1 गुणांची कमाई करुन आघाडी घेतली. दुसऱ्या राऊंडमध्ये चेतन रेपाळे याने आक्रमक खेळी करुन 2 गुणांची कमाई केली. शेवटच्या दीड मिनीटात दोन्ही मल्लांनी 2-2 गुणांची बरोबरी साधली. पुन्हा रेपाळे याने 2 गुण मिळवून आघाडी घेतली. 50 सेकंद असताना डफडे याने 2 गुण घेऊन 4-4 ची पुन्हा बरोबरी साधली. 40 सेकंद असताना रेपाळे याने 1 व शेवटच्या 15 सेकंदात पुन्हा 2 गुणांची आघाडी घेऊन 5-7 गुणांनी विजय संपादन केला.


निमंत्रित कुस्त्यांमध्ये स्पर्धेचे खास आकर्षण ठरलेल्या महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील विरुद्ध महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर यांच्यात 1.5 लाख रुपयांची व महिला विभागात नॅशनल मेडलिस्ट उषा कुमारी विरुद्ध नॅशनल मेडलिस्ट सोनाली मंडलिक यांच्यात एक लाख रुपयांवर निमंत्रित कुस्ती लावण्यात आली. दोन्ही कुस्त्या अत्यंत अटातटीच्या व रंगदार झाल्या. यामध्ये हर्षद सदगीर आणि सोनाली मंडलिक यांनी प्रतिस्पर्धी मल्लाला चितपट करुन विजय संपादन केले. तसेच शिवराज राक्षे याने देखील उत्कृष्ट खेळी करुन विजय मिळवला.


उपस्थितांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीसे देण्यात आली. तर देवाभाऊ केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता चेतन रेपाळे याला कै. छबु पैलवान लांडगे यांच्या स्मरणार्थ चांदीची गदा देण्यात आली. यावेळी स्पर्धेचे आयोजक अरुण मुंढे, जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष पै. वैभव लांडगे, खजिनदार पै. नाना डोंगरे, नंदू मुंढे, फारुक पटेल, सुनीलभाऊ धोत्रे, पप्पू शिरसाठ, बापूराव चव्हाण, युवराज पठारे, विक्रम बारवकर, तुषार वैद्य, अमोल सागडे, डॉ. कृष्णा देहाडराय, एकनाथ कुसळकर, अंकुश कुसळकर, मगर कडू, कमलेश गांधी, दिगंबर काथवटे, माजी उपनगराध्यक्ष वजीर पठाण, विक्रम बारवकर, दिपक डावखर, रमेश दारकुंडे, विनोद मोहिते, सालार शेख, माऊली खेडकर, बाळासाहेब कोळगे, एकनाथ शिरसाठ, गणेश गर्जे, उदय मुंढे, सुनील जगताप, क्रीडा अधिकारी भाऊसाहेब वीर, माजी सैनिक विनोद शेळके, पप्पू केदार, अंकुश ढाकणे, सोमा मोहिते, अभी बडे, अंबू पहिलवान, प्रकाश चित्ते आदींसह संयोजन समितीचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या स्पर्धेते विविध वजन गटातील स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:-
42 किलो वजन गट विजयी- प्रणव गुंजाळ (संभाजीनगर), उपविजयी- ओंकार थोरात (बुऱ्हाणनगर), तृतीय- फैसल पठाण (संभाजीनगर).
48 किलो वजन गट विजयी- समर्थ शहापूरकर (माळवाडा), उपविजयी- विशाल कुल्लाळ (बुऱ्हाणनगर), तृतीय- अर्जुन जाधव (बुऱ्हाणनगर).
52 किलो वजन गट विजयी- पारस बिडगर (मांडवे), उपविजयी- शुभम परजने (बीड), तृतीय- देवानंद राऊत (जामखेड).
55 किलो वजन गट विजयी- जादू सतरकर (गेवराई), उपविजयी- सुरज जाधव (बुऱ्हाणनगर), तृतीय- प्रणव खंडागळे (पुणे).
60 किलो वजन गट विजयी- शुभम लांडगे (वडगाव), उपविजयी- अविनाश गाडे (आष्टी), तृतीय- जयेश जाधव (मालेवाडी).
65 किलो वजन गट विजयी- शुभम जाधव (नेवासा) उपविजयी- सचिन मुरकुटे (कर्जत), तृतीय- ऋषिकेश उचाळे (शिरपूर).
74 किलो वजन गट विजयी- सौरभ मराठे (कापूरवाडी), उपविजयी- तुषार खामकर (जामखेड), तृतीय- अभिषेक गहिराळे (बीड).
84 किलो वजन गट विजयी- महेश फुलमाळी (नेवासा), उपविजयी- ऋषिकेश शेळके (कर्जत), तृतीय- गणेश चव्हाण (कर्जत)
खुला गट देवाभाऊ केसरी विजेता- चेतन रेपाळे (पारनेर), उपविजयी- कौतुक डफडे (पुणे), तृतीय- विजय पवार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *