देवाभाऊ केसरी कुस्ती स्पर्धा
तोडीस तोड बलदंड मल्ल एकमेकांना भिडले
नगर (प्रतिनिधी)- शेवगाव येथे देवाभाऊ केसरी कुस्ती स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दि.5 जून) मल्लांनी डावपेचांची उधळण करीत उपस्थित प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. अहिल्यानगर जिल्हा तालीम संघ, शेवगाव तालुका तालीम संघ आणि वंदे मातरम क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली कुस्ती स्पर्धा खंडोबा मैदानावर रंगली आहे. सुरु असलेल्या या स्पर्धेत तोडीस तोड असलेले बलदंड मल्ल एकमेकांना भिडले.

दोन मातीच्या आखाड्यात एकाच वेळी कुस्त्या सुरु होत्या. मल्लांनी भारंदाज, एकेरी-दुहेरी पट, मुलतानी, ढाक, कलाजंग आदी डावपेचांनी प्रतिस्पर्धी मल्लांना आसमान दाखवले.

तर काही अटीतटीच्या कुस्त्यात मल्लांनी गुणांनी विजय मिळवला. या स्पर्धेत उतरलेल्या दिग्गज मल्लांनी विजय मिळवून आगेकूच केली. जिल्ह्यासह राज्यातून विविध ठिकाणाहून मोठ्या संख्येने आलेल्या मल्लांच्या कुस्त्या सकाळी 8 वाजल्यापासून सुरु करण्यात आल्या होत्या.

पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी कुस्ती पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. संध्याकाळी सर्व गटातील अंतिम सामने व दिग्गज मल्लांच्या निमंत्रित कुस्त्या होणार आहे.