जिल्ह्यासह राज्यातील 250 पेक्षा अधिक कुस्तीपटूंचा सहभाग
पैलवानला जात धर्म नसतो, हनुमानजींचे अंश त्यांच्यात असते -आदिनाथ महाराज शास्त्री
नगर (प्रतिनिधी)- शेवगाव येथे बुधवारी (दि.4 जून) देवाभाऊ केसरी कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री, ह.भ.प. राम महाराज झिंजुर्के व रेणुका मल्टीस्टेटचे चेअरमन प्रशांत भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले. अहिल्यानगर जिल्हा तालीम संघ, शेवगाव तालुका तालीम संघ आणि वंदे मातरम क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कुस्ती स्पर्धेत नगर जिल्ह्यासह राज्यातील 250 पेक्षा अधिक कुस्तीपटू कुस्ती स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

शेवगावच्या खंडोबा मैदानावर कुस्तीचा थरार रंगला असून, पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी पहिल्याच दिवशी कुस्ती पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. या उद्घाटन सोहळ्यासाठी ज्ञानेश्वर महाराज बटूळे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा या स्पर्धेचे आयोजक अरुण मुंढे, जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष पै. वैभव लांडगे, खजिनदार पै. नाना डोंगरे, क्रीडा अधिकारी भाऊराव वीर, जगदीशशेठ धूत, विहीपचे वंजारी सर, नंदू मुंढे, प्रशांत भालेराव, तुषार वैद्य, अमोल सागडे, डॉ. कृष्णा देहाडराय, एकनाथ कुसळकर, अंकुश कुसळकर, मगर कडू, कमलेश गांधी, दिगंबर काथवटे, माजी उपनगराध्यक्ष वजीर पठाण, विक्रम बारवकर, दिपक डावखर, रमेश दारकुंडे, विनोद मोहिते, सालार शेख, माऊली खेडकर, बाळासाहेब कोळगे, एकनाथ शिरसाठ, गणेश गर्जे, उदय मुंढे, सुनील जगताप, क्रीडा अधिकारी भाऊसाहेब वीर, माजी सैनिक विनोद शेळके, पप्पू केदार, अंकुश ढाकणे, सोमा मोहिते, अभी बडे, अंबू पहिलवान, प्रकाश चित्ते आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविकात अरुण मुंढे म्हणाले की, राजकारणात आल्यानंतर खेळाकडे दुर्लक्ष झाले, मात्र खेळाडूवृत्तीचा पिंड सोडला नाही. वंदे मातरम क्रीडा मंडळाच्या माध्यमातून युवकांना व्यायामाची आवड निर्माण होण्यासाठी व त्यांना दिशा देण्यासाठी व्यायामशाळा व कुस्ती संकुल उभारले. त्याचे उद्घाटन सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात या कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. शेवगावमध्ये पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात कुस्त्याचे नियोजन करण्यात आले असून, या स्पर्धेत एक पंजाब केसरी तर तीन महाराष्ट्र केसरी एकाच आखाड्यात उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी प्रारंभी पहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात जीव गेलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पाहुण्यांचे स्वागत व संत पूजन नंदूभाऊ मुंढे यांच्या हस्ते करण्यात आले. पाहुण्यांचा पगडी घालून सन्मान करण्यात आला. आखाडा व बजरंग बलीच्या प्रतिमेचे पूजन करुन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कुस्ती लावून या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

आदिनाथ महाराज शास्त्री म्हणाले की, पैलवान मुलांमध्ये व वस्तादात हनुमानजीचे रुप दिसते. आपल्या संस्कृतीतील कुस्ती खेळाला चालना देण्यासाठी घेण्यात आलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. अरुण मुंढे हे स्वत: खेळाडू असल्याने त्यांनी खेळाडूंची खरी किंमत करून कुस्ती फड रंगवला. पैलवानला जात धर्म नसतो, हनुमानजींचे अंश त्यांच्यात असते. सातत्याने कुस्ती आखाडा घेण्याचे त्यांनी आवाहन केले.
प्रशांत भालेराव यांनी स्पर्धेला शुभेच्छा देऊन, शेवगाव तालुक्यात विविध क्रीडा स्पर्धांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. राम महाराज झिंजुर्के यांनी तरुणांनी शरीर संपदा कमविण्यासाठी व्यायाम केला पाहिजे. कुस्तीने मन व शरीर सदृढ बनते. निरोगी आरोग्यासाठी कुस्ती खेळ खेळण्याचे त्यांनी सांगितले. कुस्तीचे समालोचन हंगेश्वर धायगुडे यांनी केले. पंचप्रमुख रवी बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्त्या पार पाडत आहे.
पहिल्या दिवशी 42, 48, 52, 55, 60, 65, 74, 84 किलो आणि 84 ते 125 किलो ओपन गटातील कुस्त्यांना प्रारंभ झाले. गुरुवारी (दि.5 जून) निमंत्रित कुस्त्या होणार आहे.