• Sat. Jul 11th, 2026

Mirrornews24

Marathi News

ब्लॅक होल लोकशाही, धर्माधारित सत्तासाधनेचे आत्मघातकी ध्यासपर्व

ByMirror

Jun 3, 2025
पीपल्स हेल्पलाइनच्या वतीने धोक्याचा इशारा

पीपल्स हेल्पलाइनच्या वतीने धोक्याचा इशारा


धर्माधारित सत्तासाधना आत्मघातकी प्रक्रिया ठरणार असल्याचा दावा

नगर (प्रतिनिधी)- लोकशाही ही मूलतः सर्व समावेशक, विवेकी आणि विविधतेला सामावून घेणारी व्यवस्था आहे. मात्र, जेव्हा धर्म , सत्तेचे साधन बनतो, तेव्हा लोकशाहीचा आत्मा हरवतो आणि ती एका ब्लॅक होल लोकशाहीत रूपांतरित होते. जिथे एकच धार्मिक ओळख केंद्रस्थानी राहते, तर इतर आवाज गिळून टाकले जातात. अशी व्यवस्था समाजात पसरत असल्याचा, गंभीर इशारा पीपल्स हेल्पलाइनच्या वतीने देण्यात आला आहे.


ब्लॅक होल म्हणजे खगोलशास्त्रीय दृष्टीने एक असे ठिकाण, जिथून प्रकाशही बाहेर पडू शकत नाही. त्याचप्रमाणे, ब्लॅक होल लोकशाही ही अशी राजकीय संरचना आहे जिथे सत्ता एका धार्मिक ओळखीत केंद्रित होते. न्याय, विवेक आणि सहिष्णुता हरवते, मतदान केवळ भावना आणि ध्रुवीकरणावर आधारित होते, नेतृत्व अंध आणि अहंकारी बनत असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.


भारतीय संविधान सर्व धर्मांना समान मान्यता देणारा धर्मनिरपेक्षतेचा पाया घालतो. पण आज काही राजकीय शक्ती धर्माचा वापर केवळ सत्तेसाठी करत आहेत. धार्मिक भावना भडकवून मतांचे ध्रुवीकरण केले जाते, विशिष्ट धर्माला वरचढ मानून इतरांचे अधिकार डावलले जातात, इतिहासाचे मिथकीकरण करून समाजात द्वेष पसरवला जात असल्याचा आरोप ॲड. कारभारी गवळी यांनी केला आहे.


संघटनेच्या वतीने ब्लॅक होल लोकशाहीची 5 लक्षणे स्पष्ट करण्यात आली आहे. 1) अल्पसंख्यकांचे दमन: त्यांच्या देशभक्तीवर प्रश्‍नचिन्ह, हक्कांचे उल्लंघन आणि दुय्यम वागणूक, 2) संविधानिक मूल्यांचा अपमान: धर्मनिरपेक्षता, समता, बंधुता यांची अवहेलना; कायदे बहुसंख्याकांच्या बाजूने झुकतात. 3) विवेकी चर्चेचा मृत्यू: भावना प्रधान प्रचार; पुरावा, विज्ञान आणि तर्क दुर्लक्षित. 4) अहंकारी नेतृत्व: नेते स्वतःला धर्माचे रक्षक समजून विरोध झिडकारतात. 5) इतिहासाचे विकृतीकरण: एकतर्फी धार्मिक दृष्टिकोन समाजावर लादला जात असल्याचे म्हंटले आहे.


धर्म हे सहिष्णुता, प्रेम आणि सत्याचा मार्ग शिकवतो. पण जर तो द्वेष, तिरस्कार आणि अहंकारासाठी वापरला गेला, तर ते आध्यात्मिक पतनाचे लक्षण ठरते. हिटलर, मुसोलिनी, औरंगजेब, स्टालिन यांसारखे नेते नॅनो ब्लॅक होल्स ठरले. ज्यांनी धर्म, वांशिक अभिमानाच्या नावाने असंख्यांचे जीवन उद्ध्वस्त केले. जर आजच्या भारतात धर्माधारित सत्तासाधना होत असेल, तर तीही त्याच प्रकारची आत्मघातकी प्रक्रिया ठरेल. लोकभक्ती, ज्ञानभक्ती, कर्मभक्तीचा समावेश असलेले लोकभज्ञाक नेतृत्व समाजाला दिशा देणारे ठरणार असून, यासंदर्भात नागरिकांनी जागृक होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *