• Sun. Jul 20th, 2025

जोरदार पावसानंतर स्थगित झालेली देवाभाऊ जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धा 4 व 5 जूनला रंगणार

ByMirror

May 29, 2025

शेवगावच्या आखाड्यात रंगणार थरारक कुस्त्या

नगर (प्रतिनिधी)- नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे स्थगित करण्यात आलेली देवाभाऊ जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धा 2025 आता येत्या 4 व 5 जून 2025 रोजी नियोजित वेळापत्रकानुसार पार पडणार आहे. भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा या स्पर्धेचे आयोजक अरुण मुंढे आणि जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष पै. वैभव लांडगे यांनी ही माहिती दिली आहे.
या भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन अहिल्यानगर जिल्हा तालीम संघ, शेवगाव तालुका तालीम संघ आणि वंदे मातरम क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने खंडोबानगर, शेवगाव येथील मैदानावर करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे मैदानाची व मल्लांच्या वाहतुकीची अडचण निर्माण झाल्याने ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र आता नवीन तारखांनुसार पुन्हा नियोजन करण्यात आले असून, सर्व मल्लांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.


या स्पर्धेचे उद्घाटन बुधवार, दि. 4 जून रोजी सायंकाळी 6 वाजता तारकेश्‍वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री महाराज, राम महाराज झिंजुर्के व प्रशांत (नाना) भालेराव यांच्या हस्ते होणार आहे. तर बक्षीस वितरण समारंभ गुरुवार, दि. 5 जून रोजी सायंकाळी 6 वाजता होणार असून, यावेळी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याच वेळी जीम व कुस्ती संकुलाचे उद्घाटन सुद्धा होणार आहे.


या स्पर्धेचे खास आकर्षण म्हणजे थरारक निमंत्रित कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख विरुद्ध दिल्लीचा रुस्तुम हिंद अजय बनवाल यांच्यात 2 लाख रुपयांच्या बक्षीसाची कुस्ती रंगणार आहे. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील विरुद्ध महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर यांच्यात 1.5 लाख रुपयांची कुस्ती होणार आहे. महिला कुस्तीतही जोरदार स्पर्धा पाहायला मिळणार असून नॅशनल मेडलिस्ट उषा कुमारी विरुद्ध नॅशनल मेडलिस्ट सोनाली मंडलिक यांच्यात 1 लाख रुपयांची निमंत्रित कुस्ती होणार आहे.


या स्पर्धेत लहान गटांपासून मोठ्या गटांपर्यंत एकूण 9 गटांतील मल्लांचा समावेश असणार आहे. सर्व विजयी मल्लांसाठी भरघोस बक्षिसांचे नियोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील एक नंबरचा मल्ल स्व. छबू पैलवान लांडगे यांच्या स्मरणार्थ चांदीची गदा प्रदान करण्यात येणार आहे. शेवगाव तालुक्यातील आणि जिल्ह्यातील सर्व कुस्तीप्रेमींनी या भव्य कुस्ती स्पर्धेला उपस्थित राहण्याचे म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *