महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करुन उत्कृष्ट मल्लखांबचे सादरीकरण
नगर (प्रतिनिधी)- भारत सरकारचा उपक्रम खेलो इंडिया बीच गेम 2025 मध्ये मल्लखांब स्पर्धेत अहिल्यानगरचा उदयोन्मुख खेळाडू ओम घनश्याम सानप याने सांघिक क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करून रौप्य पदक पटकाविले.
नुकतीच ही स्पर्धा गुजरात मधील ब्ल्यू फ्लॅग बीच दिव दमन येथे संपन्न झाली. या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र मल्लखांब संघात सानप याने राज्याचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धा पुरलेला मल्लखांब, टांगता मल्लखांब तसेच दोरीवरील मल्लखांब या क्रीडा प्रकारात घेण्यात आल्या. या तिन्ही प्रकारामध्ये ओम सानप तसेच महाराष्ट्र संघाने उत्कृष्ट कामगिरी करून द्वितीय क्रमांकाचे विजेतेपद मिळविले.
ठाणे येथे झालेल्या राज्य निवड चाचणी स्पर्धेतून राज्यातील उत्कृष्ट सहा मुलांची या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती. सर्वच खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. या संघात ओम सानप (अहिल्यानगर), कौशिक राजगुरू (ठाणे), राहुल कताळे (पुणे), चेतन मंक्रे (जळगाव), स्वराज पाटील (नाशिक), ओम खामकर (पुणे) या खेळाडूंचा समावेश होता.
ओम सानप हा मार्कंडेय विद्यालयाचे क्रीडा शिक्षक कै. गणपत सानप सर यांचा नातू असून, क्रीडा शिक्षक महासंघाचे राज्य खजिनदार व तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या राज्य संघटनेचे उपाध्यक्ष घन:श्याम सानप आणि चक्रधर स्वामी प्राथमिक विद्यालयाच्या आदर्श शिक्षिका क्रांती सानप-पालवे यांचा मुलगा आहे. त्याने माध्यमिकचे शिक्षण श्री मार्कंडेय विद्यालय गांधी मैदान येथे घेतले असून, ना. ज.पाऊलबुद्धे विद्यालय येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे.
एम.एम.वाय.टी.सी. प्रेमदान चौक या क्लबचा तो खेळाडू असून गेल्या पाच वर्षांपासून तो मुख्य प्रशिक्षक उमेश झोटिंग, प्रणिता तरोटे, आप्पा लाडाने आदींच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. ओम च्या या यशाबद्दल आमदार संग्राम जगताप, श्री विशाल गणपती देवस्थानचे विश्वस्त प्रा. माणिक विधाते, जिल्हा क्रीड अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे, विशाल गर्जे, प्रियांका खिंडरे, भाऊराव वीर, नगरसेवक निखिल वारे, मार्कंडेय विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीप छिंदम, पाऊलबुद्धे विद्यालयाचे प्राचार्य भरत बिडवे, माजी नगरसेवक संपत बारस्कर, अजिंक्य बोरकर, कुमारसिंह वाकळे, जिल्हा मल्लखांब असोसिएशनचे अध्यक्ष श्री. धोत्रे, सचिव अमित जिंसीवाले, ज्येष्ठ मार्गदर्शक होनाजी गोडाळकर, नंदेश शिंदे, निलेश कुलकर्णी आदींसह मल्लखांब असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.