• Sat. Jun 20th, 2026

Mirrornews24

Marathi News

माजी सैनिकाचे जिल्हा उपनिबंधक कार्यालया समोर चौथ्या दिवशीही उपोषण सुरुच

ByMirror

Mar 28, 2025
माजी सैनिकाचे जिल्हा उपनिबंधक कार्यालया समोर चौथ्या दिवशीही उपोषण सुरुच

बुधवारी रात्री तब्येत खालवल्याने उडाला गोंधळ; दबावतंत्राने उपोषण उधळण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप

नगर (प्रतिनिधी)- मुलाचे बेकायदेशीर निलंबन रद्द होण्यासाठी केलेल्या उपोषणानंतर मिळालेल्या लेखी आश्‍वासनाची अंमलबजावणी झाली नसल्याने पुन्हा माजी सैनिक सुंदर मेहेर यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालया समोर कुटुंबीयांसह उपोषण सुरु केले आहे. बुधवारी रात्री त्यांच्या तब्येत खालवल्याने तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांनी त्यांना उपोषण मागे घेण्यास सांगितले. मात्र त्यांनी मागाणी पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरु ठेवण्याचा पवित्रा घेतला असून, गुरुवारी (दि.27 मार्च) देखील चौथ्या दिवशी त्यांचे उपोषण सुरु होते.


चुकीचे दिशाभूल करणारे पत्र देऊन पोलिसांच्या मदतीने दबावतंत्राने उपोषण उधळण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप माजी सैनिक मेहेर यांनी केला आहे. या उपोषणात मंदा मेहर, नितीन मेहेर, सीमा मेहेर सहभागी झाले आहेत.
पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेत क्लार्क म्हणून असलेल्या नितीन मेहेर यांना कोणतीही पूर्व सूचना व नोटीस न देता पुन्हा निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, त्यामुळे संपूर्ण कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली असताना माजी सैनिक कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर यापूर्वी उपोषण केले होते. या प्रकरणात जिल्हा उपनिबंधकांनी मध्यस्थी करुन माजी सैनिक सुंदर मेहेर यांना लेखी आश्‍वासन देऊन उपोषण मागे घेण्यास लावले होते. सदरचे निलंबन रद्द करण्याबाबत येत्या संचालक मंडळ सभेमध्ये विषय घेऊन निलंबन रद्द करण्याबाबतचा ठराव घेतल्यानंतर त्यांचे निलंबन रद्द करण्यात येणार असल्याचे लेखी पत्रात म्हंटले होते.


मात्र चेअरमन, संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा उपनिबंधक यांचे लेखी आदेश व दिलेल्या आश्‍वसनाची पूर्तता न करता निलंबनाची कारवाई अद्यापि रद्द केलेली नाही. मुलाचे निलंबन रद्द न केल्याने पुन्हा स्थगित केलेले उपोषण जिल्हा उपनिबंधक यांच्या कार्यालयासमोर माजी सैनिक मेहेर यांनी सुरु केलेले आहे.

जिल्हा उपनिबंधक यांच्या लेखी आदेशाचा अवमान व पायमल्ली करणारे चेअरमन, संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, बँकेचे क्लार्क असलेले नितीन मेहर यांचे निलंबन तात्काळ रद्द करून त्यांना कामावर हजर करून घ्यावे, निलंबन काळातील पगार दिवाळी बोनस शासन कामगार कायद्याप्रमाणे जमा करण्याची मागणी माजी सैनिक सुंदर मेहेर यांनी केली आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *