होळीनिमित्त गरजूंना मिष्टान्न भोजनाचे वाटप
भारतीय संस्कृतीप्रमाणे सण-उत्सव साजरे करुन गरजूंना आधार देण्याचे लंगर सेवेचे कार्य प्रेरणादायी -आ. संग्राम जगताप
नगर (प्रतिनिधी)- कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून भुकेल्या गरजूंना जेवण पुरविणाऱ्या गुरु अर्जुन समाजिक प्रतिष्ठान संचलित घर घर लंगर सेवेच्या तारकपूर येथील अन्न छत्रालय येथे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते होळी पेटविण्यात आली. तर गरजूंना मिष्टान्न जेवणाच्या पाकिटांचे वितरण करण्यात आले.
प्रारंभी विधीवत पूजा करुन होळी प्रज्वलीत करण्यात आली होती. यावेळी लंगर सेवेचे जनक आहुजा, हरजितसिंह वधवा, प्रितपालसिंह धुप्पड, अमोल गाडे, राजेंद्र कंत्रोड, मुन्ना जग्गी, सुमित कुलकर्णी, जीतू गंभीर, जय रंगलानी, दामू भटेजा, चिंटू गंभीर, जतीन आहुजा, कैलाश नवलानी, बल्लू सचदेव, राजेंद्र कंत्रोड, गुलशन कंत्रोड, सुनिल थोरात, प्रशांत मुनोत, करन गंभीर, सतीश गंभीर, राजू जग्गी आदींसह सेवादार उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, शहरात कोणीही उपाशी झोपू नये, ही संकल्पना घेऊन कोरोना काळात शहरातमध्ये लंगर सेवेने दिलेले योगदान प्रेरणादायी आहे. भारतीय संस्कृतीप्रमाणे सण-उत्सव साजरे करुन गरजूंना आधार देण्याचे काम देखील या सेवेच्या माध्यमातून होत आहे. केवळ अन्नपुरवठा न करता, विविध स्तरावर मदतीचा हात देण्याचे काम लंगर सेवेचे सेवादार करत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. जनक आहुजा व हरजितसिंह वधवा यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रितपालसिंह धुप्पड यांनी आभार मानले.