शहरात रॅली काढून पथनाट्याचे सादरीकरण
नगर (प्रतिनिधी)- शहरातील गांधी मैदान येथील प्रा. बत्तीन पोट्यान्ना प्राथमिक विद्यालयात पर्यावरण पुरक होळी उत्साहात साजरी करण्यात आली. या सणाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना जल प्रदूषण आणि पर्यावरणाविषयी जागरूकतेसाठी शहरातून रॅली काढून पथनाट्य सादर केले.
कार्यक्रमाची सुरुवात पाणी वाचवण्यासंबंधी महत्त्वपूर्ण माहिती देण्याच्या उद्देशाने करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण सिद्दम, मुख्याध्यापक श्रीनिवास मुत्त्याल, रावसाहेब इंगळे, अनंता गाली, शोभा बडगू, सरोजनी आतकरे, सीएसआरडी एमएसडब्ल्यूचे छात्र शिक्षक हर्षदा मंडलीकर, दुर्गा केदार, श्रवण घुगरे, प्रसंतो गोग्वाय, शुभम वाघमारे आदी उपस्थित होते.
जल प्रदूषणाचे कसे नियंत्रण करावं आणि पाण्याचा अपव्यय थांबविण्यासाठी काय उपाय करावेत? याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. रॅलीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षणासाठी विविध संदेश देणारे फलक हातात घेतले होते.
यासोबतच नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी एक पथनाट्य सादर केले, ज्यामध्ये पाण्याचे प्रदूषण व अपव्यय आणि पर्यावरणाचे संरक्षण कसे करावे याची माहिती देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी पाणी वाचवा व पर्यावरणाची काळजी घ्या च्या घोषणा देऊन पर्यावरण पुरक पध्दतीने होळी साजरी करण्याचा संदेश दिला.