• Thu. Mar 13th, 2025

केडगावच्या अंबिका प्राथमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात

ByMirror

Feb 12, 2025

सण-उत्सव, परंपरेचे सांस्कृतिक कार्यक्रमातून सादरीकरण

रयतच्या बहरलेल्या वटवृक्षाखाली शिक्षणाची गंगा वाहत आहे -शिवाजीराव भोर

नगर (प्रतिनिधी)- केडगाव देवी येथील रयत शिक्षण संस्थेच्या अंबिका प्राथमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर महाराष्ट्रातील संस्कृतीचे दर्शन घडविले. तर सण-उत्सव, परंपरेचे सांस्कृतिक कार्यक्रमातून सादरीकरण केले. विविध हिंदी-मराठी गाण्यावर रंगलेल्या नृत्याने सांस्कृतिक कार्यक्रमात रंग भरला होता.


कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव शिवाजीराव भोर, सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, उत्तर विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे, प्राचार्य तथा विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, रावसाहेब सातपुते, प्रशांत कोतकर, रघुनाथ लोंढे, किसन सातपुते, महेश गुंड, पत्रकार रविंद्र देशपांडे, माजी मुख्याध्यापक कृष्णाजी थोरात, महेश ढगे, सिताराम जपकर, बाबासाहेब जगदाळे, बापूसाहेब दिघे, नम्रता ससाणे, प्राथमिक विभाग प्रमुख पुजा गोरे, शुभम गाडे, कांचन झरेकर, शितल गायकवाड, प्रियंका राजदेव, अश्‍विनी टेमकर, जयश्री भोर, वर्षा शेलार, स्वाती जाधव, रेखा रासकर, कीर्ती पावसे, कविता शेळके, विशाखा जाधव, सुवर्णा घोडके, मदतनीस सविता बुगे, सुवर्णा शिंदे, रेखा शिंदे आदींसह शाळा समिती, स्थानिक सल्लागार समिती, सखी सावित्री समिती, पर्यवेक्षक, सेवक आणि विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रास्ताविकात प्राचार्य तथा विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे यांनी शाळेच्या विविध उपक्रमाची माहिती देऊन, शाळेचा वाढता गुणवत्तेचा आलेख मांडला. तर शाळेत केडगावच्या पंचक्रोशीतील 583 विद्यार्थी प्राथमिक विद्यालयात शिक्षण घेत असल्याचे स्पष्ट केले.


शिवाजीराव भोर म्हणाले की, रयतच्या बहरलेल्या वटवृक्षाखाली शिक्षणाची गंगा वाहत आहे. या वटवृक्षाच्या छायेत शिक्षणाने अनेकांनी आपले भवितव्य घडविले आहे. पद्मश्री पोपटराव पवार हे देखील श्री अंबिका माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. अनेक दिग्गज व्यक्तीमत्व या शाळेतून घडले आहेत. ही शाळा केडगावचे भूषण असून, प्राथमिकला मान्यता मिळाल्याने या परिसरातील लहान विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण घेता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


ज्ञानदेव पांडुळे म्हणाले की, संस्थेतील विद्यार्थी उंच भरारी घेऊन गुणवत्ता सिद्ध करत आहे. पालकांनी मुलांना वेळ देऊन त्यांच्या सकस आहारावर लक्ष द्यावे. मुलांच्या शिक्षण व आरोग्याबाबत जागृक रहावे लागणार आहे. काही विद्यार्थ्यांना शिक्षणा घेण्यासाठी पैसे नाही, तर काही विद्यार्थी मौजमजेसाठी चार्टर्ड विमान उडवीत आहेत. ही समाजातील विषमता समाज उघड्या डोळ्यांनी बघत आहे. चंगळवादात आपल्या मुलांना शिक्षण व संस्काराची शिदोरी देण्याचे त्यांनी आवाहन केले.


गणेश वंदनाने सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात झाली. कोळी नृत्य व पोतराज नृत्यासह जागरण गोंधळाने कार्यक्रमाची रंगत वाढवली. आंम्ही शिवकन्या या गीतांमधून स्त्री शक्तीचे दर्शन घडविण्यात आले. देशभक्ती व विविध संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या नृत्याच्या बहारदार सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. चल सर्जा, चल राजा या शेतकरी…, राज आलं, राज आलं…. गीताने उपस्थितांची मने जिंकली. लूंगी डान्स, चंदा चमके, स्कूल चले हम, मला भी जत्रेला येऊ द्या की, जन्म बाईचा बाईचा आदी गीतांवर सांस्कृतिक कार्यक्रम रंगले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांचन झरेकर व प्रियंका राजदेव यांनी केले. आभार प्राथमिक विभाग प्रमुख पुजा गोरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *