भारतीय जनता पार्टी आणि राजमुद्रा प्रतिष्ठानचा उपक्रम; महिला व युवतींनी लुटला मनोरंजनात्मक खेळाचा आनंद
सुजयला संधी दिली तर ते नक्कीच केडगाव येथून चांगले युवा नेतृत्व म्हणून पुढे येतील -आ. संग्राम जगताप
नगर (प्रतिनिधी)- केडगाव, भूषणनगर येथे युवा सामाजिक कार्यकर्ते सुजय अनिल मोहिते यांच्या पुढाकाराने भारतीय जनता पार्टी आणि राजमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने होम मिनिस्टर आणि खेळ पैठणीचा सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास केडगाव मधील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रंगलेला हा खेळ पैठणीच्या कार्यक्रमात विविध स्पर्धेचा सामना करीत महिला व युवतींनी मनोरंजनात्मक खेळाचा आनंद लुटला.
यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी सुजय मोहिते यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत, त्यांना चांगली संधी मिळाली तर ते नक्कीच पुढे येतील, असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, महायुती सरकारच्या माध्यमातून सुजय मोहिते हे चांगले कार्य करीत आहेत. त्यांना संधी दिली तर त्यांच्या माध्यमातून युवा नेतृत्व निश्चितपणे उदयास येईल. त्यांचे कार्य समाजाच्या कल्याणासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे. निवडणुकीतून चांगल्या चारित्र्याचे व चांगल्या विचारांचे माणसं पुढे आलेच पाहिजे. मोहिते यांच्या सामाजिक कार्याचा विशेष उल्लेख करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष ॲड. अभय आगरकर, अनिल मोहिते, मनपा स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर, भाजप सरचिटणीस अशोक गायकवाड यांच्यासह केडगाव पंचक्रोशीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

होम मिनिस्टर आणि खेळ पैठणीचा सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमात महिलांसाठी विविध खेळ आणि स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये उखाणे स्पर्धा, रिंग फेकणे, फुगे फुगवणे आणि नाव घेणे यांसारखे खेळ खेळले गेले. उद्धव कालापहाड यांनी विविध स्पर्धा घेतल्या. कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांना आकर्षक बक्षिसे प्रदान करण्यात आली. यामध्ये प्रथम क्रमांकाचे फ्रिज बक्षीस रेशमा पवार यांनी पटकाविले. त्याचप्रमाणे प्रिया चेतमल यांना वॉशिंग मशीन, देवकी भापकर यांना एलईडी टीव्ही, प्रिया बावणे यांना गॅस शेगडी, रेणुका गायकवाड यांना मिक्सर आणि मनीषा लिहिणे यांना होम थेटरचे बक्षीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तसेच इतर विजेत्या महिलांना पैठणी साडींचे वाटप करण्यात आले. केडगाव भागातील महिलांसाठी हा एक मनोरंजनात्मक आणि प्रेरणादायी कार्यक्रम ठरला.
कार्यक्रमाचे आयोजन करत असलेले सुजय मोहिते म्हणाले की, कार्यक्रम महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी आयोजित केला आहे. यामुळे महिलांचा सन्मान होईल आणि त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सोडून थोडा वेळ स्वतःसाठी मिळेल, असे सांगितले.