वाडियापार्क येथील श्री नागेश्वर महादेव मंदिरात भाविकांना महाप्रसादाचे वाटप
गोपालगिरी महाराजांनी धार्मिकतेबरोबर सेवाभाव जपला -ॲड. अभय आगरकर
नगर (प्रतिनिधी)- शहरातील टिळकरोड, वाडियापार्क येथील श्री नागेश्वर महादेव मंदिर येथे प.पू. सद्गुरु गोपालगिरी महाराज यांची 26 वी पुण्यतिथी विविध धार्मिक सोहळ्याने पार पडली. गोपालगिरी महाराजांचे समाधी पूजन, पूजा व अभिषेक करुन भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या संख्येने दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी नागेश्वर भजनी मंडळाचा सांप्रदायिक भजन कार्यक्रम देखील रंगला होता.
श्री नागेश्वर महादेव सेवाभावी संस्था ट्रस्ट, भक्त मंडळ, श्री लोकमान्य टिळक मित्र मंडळ, टिळक रोड रिक्षा स्टॉप युनियन व माथाडी कामगार संस्थेच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष ॲड. अभय आगरकर व शहर सचिव दत्ताभाऊ गाडळकर यांच्या हस्ते भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मंदिराचे महंत ठाकुरदास महाराज यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये झालेल्या कार्यक्रमासाठी श्री नागेश्वर महादेव सेवाभावी संस्था ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ गणपत गाडळकर, गोरख पडोळे, प्रकाश सैंदर, महेश एकाडे, पंचम पडोळे, मनोज लाटे, सुमित फुलडहाळे, राजू पाचारणे, अनिरुध्द कदम, सचिन घोरपडे, सचिन राऊत, अभिषेक पाथरकर, भाऊ गजबे, सुभाष जपकर, रामदास पाचारणे, सखाराम जाधव आदींसह भाविक व महिला देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
ॲड. अभय आगरकर म्हणाले की, गोपालगिरी महाराजांनी दिलेला धार्मिक व सामाजिक संदेश सर्वांसाठी दिशादर्शक आहे. त्यांनी धार्मिकतेबरोबर सेवाभाव जपला आणि या सेवाभावातून त्यांनी अनेक गोरगरिबांची सेवा केल्याचे त्यांनी सांगितले.
दत्ताभाऊ गाडळकर म्हणाले की, गोपालगिरी महाराजांनी उपेक्षित घटकांना आधार देऊन धार्मिकता रुजवली. सर्व समाजातील वंचितांना आधार देण्याचे कार्य त्यांनी केले. यामुळे परिसरातील मोठा भाविक वर्ग त्यांना जोडला गेला. श्री नागेश्वर महादेव मंदिराच्या उभारणीसाठी त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. त्यांचा हा धार्मिकतेने जोडलेला सेवाभाव पुढे घेऊन जाण्याचे कार्य सर्व सेवेकरी करत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.