संपूर्ण स्पर्धेत राखले निर्विवाद वर्चस्व
फुटबॉल संघटनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध स्पर्धा घेतल्या जाणार -नरेंद्र फिरोदिया
अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स व फर्नांडिस परिवाराच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या सातव्या अॅलेक्स फर्नांडिस फुटबॉल चषक 2022 स्पर्धेत शेवट पर्यंत आपल्या आक्रमक खेळीची छाप उमटवणार्या फिरोदिया शिवाजीयन्सने 2-0 गोलने फ्रेंडस स्पोर्टस अकॅडमीचा दारुण पराभव केला. या संपूर्ण स्पर्धेत फिरोदिया शिवाजीयन्सने आपले निर्विवाद वर्चस्व कायम ठेवले. कोणत्याही संघाला फिरोदिया शिवाजीयन्स विरोधात एकही गोल करता आलेला नसून, या संघाने एकतर्फी विजयाची घौडदौड शेवट पर्यंत राखली.
अहमदनगर जिल्हा फुटबॉल संघटना (एडीएफए) चे माजी सचिव अलेक्स फर्नांडिस यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भुईकोट किल्ला मैदान येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अंतिम सामन्यात फिरोदिया शिवाजीयन्सने व फ्रेंडस स्पोर्टसने एकमेकांविरोधात सुरुवातीपासूनच आक्रमक खेळी केली होती. फिरोदिया शिवाजीयन्सकडून उत्कृष्ट खेळी करणारा हिमांशू चव्हाण याने पूर्वार्धात 12 व्या मिनटाला पूर्वाधात गोल करुन संघाचे खाते उघडले. तर उत्तरार्धात पुन्हा हिमांशू चव्हाणने 22 व्या मिनटाला गोल करुन संघाला विजश्री मिळवून दिला. शेवट पर्यंत फ्रेंडस स्पोर्टसने अकॅडमीला खेळवत ठेवल्याने त्यांना एकही गोल करता आला नाही. 2-0 ने फिरोदिया शिवाजीयन्सने फ्रेंडस स्पोर्टसने अकॅडमीचा पराभव करुन सातवा अॅलेक्स फर्नांडिस फुटबॉल चषक पटकाविला.
अहमदनगर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया व शिवाजीयन्सचे अध्यक्ष तथा फुटबॉल संघटनेचे उपाध्यक्ष मनोज वाळवेकर यांच्या हस्ते विजयी संघ फिरोदिया शिवाजीयन्सला अॅलेक्स फर्नांडिस फुटबॉल चषक व रोख बक्षिस प्रदान करण्यात आले. तसेच उपविजयी संघ फ्रेंडस स्पोर्टसने अकॅडमीला चषक व रोख बक्षिस देण्यात आले. यावेळी रौनफ फर्नांडीस, क्रिसपीन फर्नांडीस, खालिद सय्यद, सचिव गॉडविन डिक, धनेश गांधी, अमरजित सिंह आदींसह खेळाडू व फुटबॉलप्रेमी प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, अहमदनगर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून, फुटबॉल खेळाला चालना देण्यासाठी विविध स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. शहरासह जिल्ह्यातून फुटबॉलक खेळाडू घडविण्यासाठी संघटना प्रयत्नशील आहे. मागील पन्नास वर्षापासून शहरात फुटबॉल खेळ बहरत असून, भविष्यातील पन्नास वर्षाचा वेध घेऊन उत्कृष्ट खेळाडू घडविण्यासाठी त्या दिशेने वाटचाल सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात मनोज वाळवेकर यांनी सर्वसामान्य फुटबॉल खेळाडूंना व्यासपीठ निर्माण करुन देण्याचे कार्य डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशन करत आहे. संघटनेच्या या सुवर्णमहोत्सवी वर्षात फुटबॉल खेळाला चालना दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या स्पर्धेतील बेस्ट स्ट्राईकर- हिमांशू चव्हाण (फिरोदिया शिवाजीयन्स), बेस्ट गोलकिपर- विशाल कुरणे (फिरोदिया शिवाजीयन्स), बेस्ट मिडफिल्ड- वंदन भांबळ (फिरोदिया शिवाजीयन्स), आकाश यादव (गुलमोहर स्पोर्टस), बेस्ट डिफेन्स- वेदांत पाठक (फ्रेंड्स), बेस्ट लेफ्ट स्ट्राईकर- दाऊद शेख (बाटा एफसी) यांना वैयक्तिक बक्षिसे देण्यात आली. या स्पर्धेसाठी पंच म्हणून प्रसाद पाटोळे, सागर चेमटे, गणेश शिंदे, सुशिल लोट यांनी काम पाहिले. आभार गोपीचंद परदेशी यांनी मानले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी विक्टर जोसेफ, झेव्हियर स्वामी, सचिन पात्रे, पल्लवी सैंदाणे, उपेंद्र गोलांडे यांनी आभार मानले.