• Tue. Mar 10th, 2026

कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत सर्रासपणे सुरु असलेले सर्व अवैध धंदे बंद करा

ByMirror

Dec 21, 2024

रिपाई महिला आघाडीची मागणी

अन्यथा महिला थाटणार जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर अवैध धंद्याचे दुकान

नगर (प्रतिनिधी)- शहरातील कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत सर्रासपणे सुरु असलेले सर्व अवैध धंदे बंद करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) महिला आघाडीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. गुन्हेगारी वाढलेली असताना व अवैध धंद्यांमुळे अनेकांचे संसार आणि युवकांचे जीवन उध्वस्त होत असताना या धंद्यांना आशिर्वाद देणारे पोलीस निरीक्षक यांच्या बदलीची मागणी महिलांच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर गांजा, हातभट्टी, मटका, जुगार, बिंगो, सोरट, मावा याचे दुकान लावून निषेध नोंदविण्याचा इशारा देण्यात आला आहे.


शहरातील कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत गांजा, हातभट्टी, मटका, जुगार, बिंगो, सोरट, मावाची विक्री सर्रासपणे सुरु आहे. तसेच गुन्हेगारी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तरी देखील पोलीस निरीक्षक मुद्दामहून झोपेचे सोंग घेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.


कोतवाली हद्दीत मोठ्या प्रमाणात गांजाची विक्री सर्रासपणे सुरू आहे. त्यामुळे युवक नशेच्या आहारी जाऊन त्यांच्याकडून गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत आहे. व्यसन करणारे मुले ही अल्पवयीन आहेत. व्यसनाच्या आहारी जावून त्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. तर व्यसनामुळे लग्न झालेल्यांचे संसार उध्वस्त होत आहे. विविध जुगारामुळे कमवलेले पैसे युवक त्यामध्ये गमावत आहे. त्यांच्या कुटुंबावर उपवासमारीची वेळ आली आहे. तर त्यांच्या कुटुंबीयांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. पोलीस प्रशासनाने या गोष्टींचा गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.


अवैध धंदेवाले देखील पोलीस स्टेशनला कलेक्शन सुरू असल्याने धंदे बंद होणार नसल्याचे उघडपणे बोलत आहे. पोलीस निरीक्षक यांच्या आशीर्वादाने तर हे अवैध धंदे चालत नाही ना? याची शंका नागरिकांमध्ये उपस्थित होत असल्याचे म्हंटले आहे.
शहरातील कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत सर्रासपणे सुरु असलेले सर्व अवैध धंदे बंद करावे, गुन्हेगारीवर लगाम लावावा, पोलीस निरीक्षकांची बदली करुन सक्षम पोलीस अधिकारी नेमण्याची मागणी रिपाई महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *