पवित्र शास्त्रानुसार प्रभू येशू ख्रिस्त शेवटच्या काळी (न्यायाच्या दिवसांसाठी) परत येणार!
हिवाळ्यातील थंडीने जगाला सामावून घेतले असताना, ख्रिसमसचा सण सर्वत्र हृदयांना उबदार करतो. 25 डिसेंबर रोजी साजरा केला जाणारा, ख्रिसमस हा प्रेम, कुटुंब आणि समुदायाला जपण्याचा काळ आहे. हे, आशा व शांततेचे प्रतीक असलेल्या येशू ख्रिस्ताच्या जन्माचा उत्सव आहे. तसेच, धर्म आणि सीमांच्या पलीकडे असलेल्या परंपरांनी भरलेल्या सांस्कृतिक घटनेत विकसित झाला आहे.
ख्रिसमस हा प्रभू येशूचा जन्म उत्सव आहे, कारण तो एक ऐतिहासिक व्यक्ती होता आणि त्याला केंद्र स्थानी धरून सर्व जगातील इतिहासाला दोन विभागात नमुद करण्यात येते. इतिहासातील नोंदी किंवा घटनांमध्ये आपण इ. स. पूर्व असे वाचले असेल, हे कसे मोजतात? इसा (येशू) या शब्दा पासून इसवी हा शब्द तयार झाला. इसवी ही ग्रेगोरीन कॅलेंडर मधील कालगणना येशू ख्रिस्ताच्या जन्मापासूनच केली जाऊ लागली. तसेच, सन म्हणजे वर्ष हजारो वर्षांचा काळ सोप्या पद्धतीने मोजता यावा यासाठी प्रभू येशूच्या जन्म घटनेला आधारभूत मानले गेले. त्यानुसार ख्रिस्त पूर्व (इ.स. पूर्व /बीसीई) म्हणजे येशूच्या जन्मा आधीचा काळ आणि प्रभू येशूच्या जन्मानंतर चा काळ म्हणजे इसवी सन (ॲनो डोमिनी/सीई) म्हणून जगभर ओळखला जातो.
पवित्र शास्त्र (बायबल) प्रमाणे, जगातील सर्व मानव जे पापा मध्ये जीवन जगत होते, त्यांचे जीवन बदलण्यासाठी सृष्टीच्या निर्माणकर्त्याने (देवाने) त्याचा एकुलता एक पुत्र येशू ह्या जगात मानवी रूपात पाठवले, त्याचा जन्म म्हणजेच ख्रिसमस.
प्रभू येशू ज्या वेळेस मानवी रुपात होता तेंव्हा त्याने, आंधळ्यांना डोळे दिले, लंगड्यांना पाय दिले, असे अनेक चमत्कार त्याने केले. प्रत्येक मानवाला पापातून मुक्ती मिळवण्यासाठी आणि सृष्टी निर्माणकर्त्या जवळ (स्वर्गात) प्रवेश मिळवण्याकरिता कसे जीवन जगले पाहिजे हा एक सोपा मार्ग त्याने शिकवला.
त्याकाळी काही लोकांना मात्र प्रभू येशू बद्दल ईर्ष्या वाटू लागली, कारण त्याच्या स्पर्शानेही लोक बरे होत होते म्हणून, त्यांनी आपसात मसलत करून त्याला क्रुसावर खिळिले. त्याही परिस्थितीत प्रभू येशूने त्यांना क्षमा केली. शत्रूच्या दृष्टीने येशूच्या जीवनाचा अंत झाला होता, पण सत्य तर हे आहे की येशूने आधीच भविष्यवाणी केल्याप्रमाणे मृत्यूवर विजय मिळवून तो तिसऱ्या दिवशी पुनरुथित झाला. हे केवळ त्याच्या शिष्यांनीच नाही तर इतरांनी सुद्धा त्याच्या बरोबर चाळीस (40) दिवस संभाषण केले आणि तो सर्वांसमक्ष वर मेघात निघून गेला, तो परत येण्यासाठीच.
प्रभू येशूने जे त्याच्या शिष्यांना शिकवले आणि त्यांचे जीवन बदलले; तीच सुवार्ता त्याने संपूर्ण पृथ्वीवरील लोकांना सांगण्याची आज्ञा दिली, आणि तेव्हांपासून प्रभू येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांचे व त्याचे शिक्षण अनुसरणाऱ्यांचे जीवन बदलले आहे, त्याच्या याच आज्ञाचे पालन ख्रिस्ती लोक मोठ्या गांभीर्याने करताना दिसतात.
आपल्याकडे असा एक समज आहे की, ब्रिटिशांनी ख्रिस्ती धर्म भारतात आणला, पण असे नाही, प्रभू येशू ख्रिस्ताच्या बारा शिष्यांपैकी थोमा नावाचा एक शिष्य त्याच वेळी भारतात (केरळ) मध्ये आला होता आणि तेंव्हापासून भारतात ख्रिस्ताचे अनुयायी आहेत.
आज जग वेगाने शेवटच्या काळाकडे चालले आहे, तितकेच वेगाने अनेक लोक निरनिराळ्या व्यसनांमध्ये गुरफटून नाशाच्या मार्गाकडे चालले आहेत, तर काही आजाराने त्रस्त होऊन मरत आहेत, अशांसाठीच प्रभू येशू म्हणत आहे – मार्ग, सत्य व जीवन मीच आहे; माझ्या द्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही. (योहान 14:6)
पवित्र शास्त्रानुसार प्रभू येशू ख्रिस्त शेवटच्या काळी (न्यायाच्या दिवसांसाठी) परत येणार आहे. (दुसरे आगमन) त्याबद्दल सांगितलेली चिन्हे आता पूर्ण होताना दिसत आहेत. पण, ह्यावेळेस तो कोणालाही वाचवण्यासाठी नाही तर, एक न्यायाधीश म्हणून, प्रत्येकाचा न्यायनिवाडा करावयास येणार आहे.
पवित्र बायबल सांगते कोणाचाही नाश होऊ नये, तर सर्वांना सार्वकालिक जीवन (मुक्ती) प्राप्त व्हावे! अशी परमेश्वराची इच्छा आहे, हाच ख्रिसमस चा संदेश आहे. ख्रिसमस व येणारे नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी व आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना….
ख्रिसमसच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
-मिसेस प्रफुल्लता ए. हिडदुगीकर
