पीपल्स हेल्पलाईन व वकील संघटना करणार युवकांची लोकशाही कर्ता म्हणून नोंदणी
लादली जाणारी सामाजिक आणि आर्थिक गुलामगिरी संपवण्यासाठी लोकशाही कर्ते नक्कीच यशस्वी होणार -ॲड. गवळी
नगर (प्रतिनिधी)- देशात सत्ताधाऱ्यांकडून संविधानाची मुल्ये पायदळी तुडवली जात असताना आणि संविधान अवमानाच्या घटना घडत असल्याने संविधान वाचविण्यासाठी लोकशाही कर्त्याची भूमिका नागरिकांनी पार पाडण्याचे आवाहन पीपल्स हेल्पलाईन व वकील संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात लोकशाही अधिक समृध्द करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये संविधानाची चेतना जागृत करण्याच्या उद्देशाने लोकशाही कर्ता पदावर व्यापक स्वरुपात नोंदणी सुरु करण्यात आल्याची घोषणा संघटनेने केली आहे.
देशात कायदा करणारे, कायद्याचा अर्थ लावणारे आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या सर्व घटकांच्या ठिकाणी उन्नत चेतना असली पाहिजे. त्याशिवाय या देशाला चांगले दिवस येऊ शकणार नाहीत. मी, माझे, मलाच ऐवजी आपण सर्व, आपण सर्वांसाठी, आपणा सर्वांचे हे विचार सर्वत्र रुजविण्याची गरज आहे. देशातील मतदार फक्त निवडणुकीच्या काळात जागे होतात आणि निवडणूक संपल्यानंतर आपली भूमिका संपली आहे, अशी भूमिका नागरिक घेतात. त्यातून ढब्बू मकात्या प्रवृत्ती पोसली जाते. त्यामुळे देशातील लोकशाही शासन प्रणाली मोडून पडते आणि सर्वत्र सत्तापेंढारी यांची लूट सुरू होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
स्वातंत्र्य पूर्वकाळात स्वातंत्र्य सैनिकांनी स्वतःची आहुती देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, परंतु त्यांची किंमत आजच्या पिढीला राहिली नाही. त्यामुळे लाखो मतदार हजार, दीड हजार रुपयात आपली मतं विकतात. ही बाब लोकशाहीला काळीमा आणणारी आहे. तसेच देशात अनेक प्रकरणातून लोकशाही आणि मुल्ये सत्ताधारी पायदळी तुडवून हुकुमशाही पध्दतीने सत्ता राबवीत आहे. यामुळे लोकशाही कर्त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. लोकशाही कर्ता सातत्याने लोकांसाठी लढत राहिल्यास त्यातून लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्ती विकसित होणार आहे. यातूनच चांगल्या उमेदवारांचे नेतृत्व समाजाला मिळणार आहे. सध्या चांगल्या उमेदवारांचा खडखडाट आहे. सर्व पक्षात भ्रष्टाचाराच्या मार्गाने उमेदवारीची तिकीट विक्री केली जाते. त्यातून सत्तापेंढारी कुबेरशाही फोफावली आहे. एका मतदारसंघात 80 ते 100 कोटी रुपये मतं खरेदीसाठी खर्च करतात, यासारखी लाजिरवाणी गोष्ट देशात कोणतीही नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
जगाच्या पाठीवर सत्य आणि अहिंसेची मुल्ये जोपासणारा भारत नैतिकतेच्या बाबतीत उन्नत चेतनाच्या बाबतीत रसतळाला चालला आहे. त्यामुळे नव्या पिढीने पुढे येऊन लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी लोकशाही कर्ता म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
राजकारण करण्यासाठी मोठा अनुभव लागतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक वयाच्या पंधराव्या वर्षी झाला. त्यामुळे भारतातील तरुण मुला-मुलींना 15 वर्षे पूर्ण होताच लोकशाही कर्ता म्हणून नाव नोंदविता येईल आणि कार्य सुरू करता येईल. जगाच्या पाठीवर महासत्ता होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्ती याच मार्गाने देशाला जावे लागणार आहे. देशात पुन्हा नव्याने लादली जाणारी सामाजिक आणि आर्थिक गुलामगिरी पूर्ण संपवण्यासाठी लोकशाही कर्ते नक्कीच यशस्वी होणार असल्याची भावना ॲड. कारभारी गवळी यांनी व्यक्त केली आहे.
