• Tue. Dec 2nd, 2025

विधानसभा निवडणुकीत लोकमकात्या मुक्त भारत आचार संहिता जारी

ByMirror

Oct 17, 2024

पीपल्स हेल्पलाइन आणि भारतीय जनसंसदेचा पुढाकार

सत्तापेंढाऱ्यांविरुद्ध लोकमकात्या बांगडी अटक सत्याग्रह करण्याचे महिलांना आवाहन

नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांपासून लोकमकात्या मुक्त भारत आचार संहिता पीपल्स हेल्पलाइन आणि भारतीय जनसंसदेच्या वतीने जारी करण्यात आली आहे. स्त्रीदास्य व मतदान दास्यातून मुक्त महिला भगीणींनी येत्या विधानसभा निवडणुकीत रांगोळ्या, फुगड्या, मेहंदी खेळावयास भाग पाडणाऱ्या सत्तापेंढाऱ्यांविरुद्ध लोकमकात्या बांगडी अटक सत्याग्रह करण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. सत्तापेंढारी व लोकमकात्यांविरुद्ध बांगडी अटक सत्याग्रहासाठी प्रचार मोहीम सुरु करण्यात आली असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी व अशोक सब्बन यांनी दिली.
संपूर्ण महाराष्ट्रातील मतदार संघात किमान 30 टक्के मतदारांसाठी प्रत्येकी 5 हजार रुपयांचा डिव्हिडंट खर्च करण्याची स्पर्धा सर्वत्र दिसून येते. महिला भगिनींसाठी फुगड्या, रांगोळी, मेहंदी असे कार्यक्रमासाठी लाखो रुपये खर्च करण्यात येत आहे. देशाला स्वातंत्र्य फुगड्या, रांगोळ्या आणि मेहंदी यातून मिळालेले नाही आणि माता-भगिनींना देवी मातेच्या दर्शनासाठी गाड्यांची व्यवस्था केल्यामुळे इंग्रज या देशातून गेलेले नाहीत. शहीद भगतसिंगांसारखे अनेक देशभक्त हुतात्मे झाले, अनेकांनी लढा दिला, त्यातून देशाला स्वातंत्र्य मिळाले. परंतु याची जाणीव लोकमकात्यांनी सोडून दिली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


सत्तेसाठी लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्ती पायदळी तुडवून सर्रास महिलांचे शोषण सुरू आहे. महाराष्ट्र राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या संस्कारातून मोठा झाला आहे. त्यामुळे हरियाणा आणि मध्य प्रदेश मध्ये केलेली गुट्टलबाजी महाराष्ट्रात चालणार नाही. त्यासाठी संघटनेने महाराष्ट्राच्या जनतेसाठी आणि विशेषतः महिला भगिनींसाठी लोकमकात्या बांगडी अटक सत्याग्रह जारी केला असल्याचे ॲड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे.
बांगडी अटक म्हणजे देशातील आणि विशेषता महाराष्ट्रातील लोकशाहीचे अवमूल्यन करू पाहणाऱ्या लोकमकात्या, सत्ता पेंढाऱ्याविरुद्ध कारवाई करून त्यांना सत्तेपासून पायउतार करुन व सामाजिक जीवनातून दूर करण्याचा सत्याग्रह आहे. माता-भगिनींना निर्लज्ज सत्तापेंढारी लालूच दाखवून साड्या वाटतात, परंतु या देशातील घरकुल वंचित महिलांना एक भूमिगुंठा देण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी काही एक प्रयत्न केला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.


महाराष्ट्रात कोट्यावधी महिला आणि त्यांचे कुटुंबीय झोपडपट्ट्यांमध्ये राहतात आणि स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतर लोकमकात्या, सत्तापेंढारी महिलांसाठी फुगड्या, रांगोळी आणि मेहंदी असे कार्यक्रम करतात. स्वार्थी आणि ढोंगी सत्तापेंढारी यांना सार्वजनिक जीवनातून दूर करणे यासाठीच बांगडी अटक सत्याग्रह जारी करण्यात आलेला असल्याचे प्रसिध्दीपत्रकात म्हंटले आहे. तर स्त्रीदास्य व मतदान दास्यातून बाहेर पडलेल्या माता-भगिनींसाठी या संघटनेने सावित्री संस्कार वंदना प्रमाणपत्र देण्याचा निर्णय जारी केला आहे. या सत्याग्रहासाठी ॲड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, ओम कदम, प्रकाश थोरात, जालिंदर बोरुडे, शाहीर कान्हू सुंबे, अशोक भोसले, वीरबहादूर प्रजापती, कैलास पठारे, सुधीर भद्रे, विठ्ठल सुरम आदी प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *