या हसन-हुसेन, या अली… या अब्बास च्या घोषणांनी परिसर दणाणला
तर मर्दानी थाटात सजले नवसाचे वाघ
अहमदनगर (प्रतिनिधी)- देशभरात उत्तर प्रदेशातील लखनौ व महाराष्ट्रात अहमदनगरचे मोहरम सर्वत्र प्रसिध्द आहेत. या मोहरमसाठी राज्यासह इतर राज्यातील भाविकही मोहरमसाठी नगर शहरात आवर्जुन हजेरी लावतात.
शहरात मोहरम उत्साहात साजरी होत असताना, रविवारी (दि.14 जुलै) मोहरमच्या सातव्या दिवशी सकाळी शिया बांधवांनी शहरातील प्रमुख मार्गावरुन पायी रॅली लाढून मातम केले. या हसन-हुसेन, या अली… या अब्बास च्या घोषणांनी परिसर दणाणला होता. तर नवसाचे वाघ देखील दिमाखात सजले होते. कोठला परिसर व मंगलगेट हवेली परिसर पारंपारिक ढोल व डोलीबाजाच्या आवाजाने निनादले.

शिया समाज बांधवांनी तेलीखुंट येथून मातमची पायी रॅली काढली होती. शहरातील तेलीखुंट, मंगळवार बाजार येथून मंगलगेट हवेली व कोठला येथील इमामे हसन-हुसेन यांच्या सवारी समोर मातम केले. स्वत:ला मारुन घेत त्यांनी हसन-हुसेन यांच्या शहिद झाल्याचा शोक व्यक्त केला. तर काही युवकांनी स्वत:वर चाकूचे वार केल्याने ते रक्तबंबाळ झाले होते. मातम पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दरवर्षी शहरातील मोहरममध्ये शिया बांधवांचे मातम हे विशेष आकर्षण असते. या सोहळ्यासाठी इराणमधूनही शिया बांधव आले होते.

तर मर्दानी थाटात सजवलेले नवसाचे वाघ सवाऱ्यांच्या दर्शनासाठी निघतात तेव्हा नगरच्या मोहरममध्ये धार्मिक एकतेचे दर्शन घडते. अनेक हिंदू-मुस्लिम बांधवांनी आपल्या चिमुकल्या मुलांना वाघ बनवून कोठला व हवेली येथील इमामे हसन-हुसेन यांच्या सवारीच्या दर्शनाला वाजत-गाजत आनले होते. तर लहान मुलींना देखील हातात बांगड्या घालून फुलांनी सजविले होते. अगदी 1 वर्षे वय असलेल्या मुलापासून ते पुरुष मंडळी नवसाचे वाघ बनून धार्मिक परंपरेत सहभागी झाले होते. मोहरममध्ये नवसाचे वाघ सजवून नवस फेडण्याची 500 वर्षांची परंपरा आहे.

मोठे इमाम हसन आणि छोटे इमाम हुसेन यांची ताबूत सवारी नवसाला पावते अशी लोकश्रद्धा आहे. त्यामुळे सर्वधर्मीय भाविक येथे नवस (मन्नत) बोलतात. मुलगा होऊन, तो वाघासारखा चपळ आणि तंदुरूस्त रहावा असे मागणे मागून मुलाला वाघासारखे तयार करून वाजतगाजत सवारींच्या दर्शनासाठी नेले जाते. मोहरमच्या सातव्या, आठव्या आणि नवव्या असे तीन दिवस नवसाचे वाघ सवारींच्या दर्शनासाठी नेले जातात.
मुलींसाठी केलेला नवस फेडण्यासाठी त्यांच्या डोक्यावर फुले ठेवून व हातात बांगड्या घालून सवारींच्या दर्शनासाठी नेले जाते. तसेच चौका-चौकातून सवारीवर चादर अर्पण करण्यासाठी मिरवणुक काढण्यात येत आहे. तर चौका-चौकात भंडाऱ्याचे व सरबत वाटपाचे आयोजन केले जात आहे. मंगळवारी (दि.16 जुलै) कत्तलच्या रात्री सवाऱ्यांची मिरवणूक निघणार आहे. यावेळी पारंपारिक 5 टेंबे पेटविण्यात येत असतात. बुधवारी (दि.17 जुलै) सवाऱ्यांची विसर्जन मिरवणुक होणार आहे.
मा. संपादक कृपया प्रसिध्दीसाठी……………….
