• Wed. Feb 18th, 2026

निमगाव वाघात आरोग्य तपासणी शिबिरात मतदार जागृती

ByMirror

May 11, 2024

तपासणीला आलेल्या ग्रामस्थांनी केला मतदानाचा संकल्प

शिबिरातून ग्रामीण भागातील ग्रामस्थांचे आरोग्य जपण्याचे कार्य -पै. नाना डोंगरे

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्नेहालय संचलित केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरच्या वतीने स्व.पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. गावातील ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करुन मतदार जागृती अभियान देखील राबविण्यात आले. शिबिरार्थींना मतदानाचे कर्तव्य बजावण्याची शपथ देण्यात आली. या शिबिरास पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


या शिबिराचे उद्घाटन डोंगरे संस्था तथा वाचनालयाचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते झाले. यावेळी एकता फाऊंडेशनचे अध्यक्ष अतुल फलके, वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना लांडे, प्रशासकीय अधिकारी अजिंक्य भिंगारदिवे, मंगेश बर्डे, गौरी लोणारे, लॅब टेक्निशियन वैशाली पंडोरे, परिचारिका हेमा धारवाडकर, कृष्णा शेलार आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, तणावपूर्ण जीवनशैलीमुळे मनुष्याचे आरोग्याचे प्रश्‍न गंभीर बनले आहे. विविध आरोग्य शिबिर गरजूंसाठी आधार ठरत आहे. गंभीर आजारांना सामोरे जाण्यापेक्षा वेळीच तपासणी करुन त्याचे निदान करणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यावश्‍यक आहे. ग्रामीण भागात आरोग्याबद्दल जागृती नसल्याने परिस्थिती अभावी ग्रामस्थ वेळोवेळी तपासणी करु शकत नाही, शिबिराच्या माध्यमातून त्यांचे आरोग्य जपण्याचे काम केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.


गावातील नवनाथ मंदिराच्या सभामंडपात झालेल्या शिबिरात ग्रामस्थांची नेत्र तपासणी, दंतरोग तपासणी व कान, नाक, घसा तपासणी करण्यात आली. तसेच ज्येष्ठ नागरिकांचा रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबीनची तपासणी करण्यात आली. मोतिबिंदू असलेल्या रुग्णांवर हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया होणार आहे. तसेच यावेळी गरजू रुग्णांना मोफत औषधाचे वाटप करण्यात आले. ग्रामस्थांना कोणत्याही अमिषाला बळी न पडता, निर्भय व धर्मनिरपेक्षपणे मतदान करुन मतदानाचा हक्क बजावण्याचा व लोकशाही सक्षम करण्याचे आवाहन करण्यात आले.

आभार युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे यांनी मानले. या उपक्रमासाठी नेहरु युवा केंद्राचे उपनिदेशक शिवाजी खरात, जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *