• Mon. Jul 13th, 2026

Mirrornews24

Marathi News

महाराष्ट्र व कामगार दिनी राबविला जाणार आजीची धनराई उपक्रम

ByMirror

Apr 29, 2024

ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्‍न सोडविण्यासाठी राष्ट्रीय लोकभज्ञाकचळवळीचा पुढाकार

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- 1 मे महाराष्ट्र दिन तसेच आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय लोकभज्ञाक चळवळीच्या माध्यमातून प्रत्येक घरी आजीची धनराई हा महत्त्वकांशी उपक्रम हाती घेऊन अंमलबजावणी जारी केली जाणार आहे. या अभियानाचा प्रारंभ सावेडी येथील ग्रीन पार्क मध्ये होणार असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.


ग्लोबल वॉर्मिंगमुळे महाराष्ट्राचे तापमान 45 डिग्री पेक्षा वर गेले आहे आणि मोठ्या प्रमाणात वाळवंटी प्रदेश विस्तारत आहे. अशा वेळेस जेष्ठ नागरिकांनी आपल्या पुढील पिढ्यांसाठी निसर्गाचा ठेवा जपण्यासाठी आणि त्याचा लाभ पुढील पिढ्यांना देण्यासाठी आजीची धनराई हा प्रकल्प लोकभज्ञाक चळवळीच्या माध्यमातून हाती घेण्यात आले असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.


संपूर्ण देशामध्ये आजीची धनराई किंवा नॅनो धनराई या स्वरूपात नव्याने परसबागा उभ्या करण्याचा प्रयत्न आहे. त्यामध्ये केशर आंबा, शेवगा, नारळ व इतर फळ उत्पादक झाडे त्याशिवाय झाडे वेली मोठ्या प्रमाणात लावण्यात याव्यात असा आग्रह संघटनेने धरला आहे.


आजी-आजोबा आणि नातवांमध्ये असणारे नाते अधिक घट्ट करण्यासाठी आजीच्या धनराईचा नक्की उपयोग होऊ शकणार आहे. लहानपणीच नातवंडांवर संस्कार करण्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे. त्याचबरोबर मुलांना निसर्ग संवर्धनाचे धडे आजी-आजोबांनी दिलेच पाहिजे. आजी-आजोबा मोठ्या प्रमाणात सेवानिवृत्त लोक असतात, त्यामुळे त्यांच्या वाटेला एक पवित्र कार्य नक्कीच आनंददायी ठरणार असल्याचे म्हंटले आहे.


त्याशिवाय लहान मुलांना खेळण्यासाठी अंगण आणि थोरमोठ्यांसाठी योग व्यायाम करण्याची व्यवस्था इत्यादी सर्व बाबी नॅनो धनराई मध्ये समाविष्ट केले आहेत. या धनराईच्या कोपऱ्यामध्ये डबलबार, सिंगलबारचा प्रस्ताव देखील संघटनेने केलेला आहे. पाश्‍चात्य कुटुंबाकडे प्रत्येक घरामध्ये होम जिम असते, परंतु भारतीय समाजात झाडे लावण्याबाबत आणि व्यायाम करण्याबाबत उदासीनता आढळून येते. भारतीयांनी आपली जीवन पद्धती बदलली आहे. त्यामुळे सायलेंट किलर्स प्रत्येक घराघरात पोहोचला आहे. अनेक लोक कॅन्सर, दमा, मधुमेह, ब्लड प्रेशर इत्यादी आजारांनी त्रस्त आहेत. धनराई याचा अर्थ फक्त पैशाच्या स्वरूपात काही मिळावे अशी अपेक्षा, नसून भारतीयांचे आरोग्य हीच मोठी संपत्ती आहे. आणि विशेषत: नवीन पिढी ही देशाची भविष्य आहे आणि अशा नवीन पिढीची सदृढ उभारणी करण्यासाठी नॅनो धनराई उपयुक्त ठरणार असल्याचे ॲड. गवळी यांनी सांगितले आहे.


शेतकऱ्यांनी एकात्मिक धनराईचा अवलंब केला पाहिजे. परंतु स्वतःच्या घराभोवती स्वतःची बाग असावी आणि निसर्गाच्या सानिध्यात आनंदी जीवन जगण्याची संधी सर्वांना मिळावी अशी अपेक्षा संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. या अभियानासाठी ॲड. गवळी, अशोक सब्बन, ओम कदम, प्रकाश थोरात, जालिंदर बोरुडे, शाहीर कान्हू सुंबे, पै. नाना डोंगरे, विठ्ठल सुरम आदी प्रयत्नशील आहेत.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *