• Tue. Jul 22nd, 2025

महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवीत रंगला हळदी-कुंकू कार्यक्रम

ByMirror

Feb 12, 2024

देवांग कोष्टी समाज महिला मंडळाच्या पारंपरिक वेशभूषा स्पर्धेत महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हळदी-कुंकू पारंपारिक संस्कृतीचे जतन करणारा सोहळा -शितल जगताप

अहमदनगर (प्रतिनिधी)- देवांग कोष्टी समाज महिला मंडळाच्या हळदी-कुंकू कार्यक्रमात महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवीत पारंपरिक वेशभूषा स्पर्धा उत्साहात पार पडली. पारंपारिक वेशभूषेत आलेल्या महिलांनी उखाणे, गवळण आदी सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. यामध्ये नववधू पासून ते ज्येष्ठ महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.


भिंगार येथील चौण्डेश्‍वरी माता मंदिरात नगरसेविका शितल संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून रेणुकाताई वराडे, मंडळाच्या अध्यक्षा राखीताई उपरे, उपाध्यक्षा अलका भंडारी, सचिव ज्योती उदबत्ते, सहसचिव तेजश्री कांबळे, खजिनदार रूपाली बाबर, शितल कांबळे, सल्लागार अनिता संगम, अनिता सोळसे, राणी लोखंडे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


नगरसेविका शितल जगताप म्हणाल्या की, हळदी-कुंकू पारंपारिक संस्कृतीचे जतन करणारा सोहळा आहे. या कार्यक्रमाने महिला एकत्र येवून आपल्या विचारांची देवाण-घेवाण करत असतात. अशा कार्यक्रमातून महिला सशक्तीकरणाला दिशा मिळत आहे. महिलांनी एकत्र येऊन एकमेकिंना पाठबळ देण्याचे त्यांनी आवाहन केले.


रेणुकाताई वराडे म्हणाल्या की, महिलांना सक्षम होण्यासाठी स्वत:चा व्यवसाय उभा करावा. कोणताही व्यवसाय लहान-अथवा मोठा नसतो. व्यवसायाची लाज न बाळगता तो व्यवसाय मोठा करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पारंपरिक वेशभूषा स्पर्धेचे परीक्षण संजीवनी साबळे यांनी केले. विजेत्या महिलांना उपस्थितांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती उदबत्ते व सहसचिव तेजश्री कांबळे यांनी केले. आभार राखीताई उपरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी देवांग कोष्टी समाज महिला मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *