इतर कामकाजासह स्वतःचे व कुटुंबाचे आरोग्य सांभाळण्याचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- पद्मशाली स्नेहिता संघमच्या वतीने महिलांच्या आरोग्याचा जागर करीत हळदी-कुंकूचा कार्यक्रम रंगला होता. घरातील महिला आनंदी, निरोगी असेल तर संपूर्ण कुटुंबाचे स्वास्थ्य चांगले राहते. महिलांनी इतर कामकाजासह गृहकर्तव्य बजवताना स्वत:च्या आरोग्याबाबतही तितकेच जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सर्व महिलांनी पारंपारिक नऊवारीचा पेहराव केला होता.
गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय शाळेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. प्रमुख पाहुण्या म्हणून स्त्री रोग तज्ञ डॉ. नयना जगताप, वेलनेस क्लबच्या अध्यक्षा ज्योती भोजणे, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा श्रीलता आडेप उपस्थित होत्या.
प्रास्ताविकात पद्मशाली स्नेहिता संघमच्या अध्यक्षा डॉ. रत्नाताई बल्लाळ यांनी संस्थेच्या माध्यमातून महिलांच्या सर्वांगीन विकासासाठी मागील 23 वर्षापासून कार्य सुरु आहे. महिला फक्त मनोरंजनापुरते एकत्र येत नसून, समाजाला दिशा देण्यासाठी सामाजिक भान ठेऊन योगदान देत असल्याचे स्पष्ट करुन सुरु असलेल्या कार्याची माहिती दिली.
डॉ. नयना जगताप यांनी घरातील महिला आनंदी निरोगी असेल तर संपूर्ण कुटुंबाचे स्वास्थ चांगले राहते. महिलांनी इतर कामकाजासह स्वतःचे आरोग्य सांभाळण्याचे त्यांनी आवाहन केले. ज्योती भोजने यांनी जीवन निरोगी व आनंदी राहण्यासाठी आहार व प्राणायामावर मार्गदर्शन केले. श्रीलता ताडेप यांनी ध्यानधारणा विषयी प्रात्यक्षिक दाखविले.
तर पद्मशाली स्नेहिता संघमच्या वतीने सर्व महिलांसाठी आरोग्य शिबिर घेऊन त्यांची तपासणी करण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी सीए भक्ति संभार, सीए दीपा द्यावनपेल्ली, जिज्ञासा छिंदम यांचा सत्कार करण्यात आला.
भाजपच्या जिल्हा सरचिटणीस सविता कोटा यांनी नमो ॲपची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरोजनी रच्चा यांनी केले. आभार आरती छिंदम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष रेखा वड्डेपल्ली, सचिव सपना छिंदम, सविता एक्कलदेवी, पुनम वन्नम, सुवर्णा पुलगम, नीता बुरा, विजया धारा,कांचन कुंटला, साधना कोलपेक यांनी परिश्रम घेतले.
