धावण्यात मिळवले पदक; ज्योत्स्ना उद्योग केंद्र सोसायटीच्या वतीने खेळाडूंचा सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- स्पेशल ऑलिम्पिक चॅम्पियनशिप ट्रायल आणि कोचिंग कॅम्प स्पर्धेत मतिमंद विकास शिक्षण मंडळ संचलित ज्योत्स्ना उद्योग केंद्र सोसायटी कार्यशाळेच्या खेळाडूंना यश संपादन केले. यामध्ये माधुरी दीपक महांडुळे हिने 100 मीटर धावण्यात द्वितीय तर अजय ज्ञानदेव काकडे याने 200 मीटर धावणे स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाविला.
आर.टी.एस. नागपूर विद्यापीठाच्या मैदानावर झालेल्या तीन दिवसीय क्रीडा स्पर्धेत मोठ्या संख्येने राज्यातील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये मतिमंद विकास शिक्षण मंडळ संचलित ज्योत्स्ना उद्योग केंद्र सोसायटी कार्यशाळेतील खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट खेळाचे सादरीकरण करुन यश संपादन केले. प्रेरणा राजकुमार भाटिया हिने 100 मीटर धावणे स्पर्धेत पाचव्या क्रमांकाचे बक्षीस मिळवले. तर माधुरी दीपक महांडुळे, अजय ज्ञानदेव काकडे यांनी सहभाग घेतला होता.
या गुणवंत खेळाडूंचा ज्योत्स्ना उद्योग केंद्र सोसायटीच्या वतीने शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश वैयकर यांनी सत्कार केला. यश संपादन करणाऱ्या खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. रवींद्र साताळकर, संस्थेचे सचिव प्रवीण कुलकर्णी, खजिनदार प्रमोद महाजन, कार्यशाळेचे प्रमुख भाऊसाहेब कदम, मतीमंद मुलांची शाळेचे मुख्याध्यापक योगेश आल्हाट यांनी अभिनंदन केले. यावेळी कार्यशाळेच्या निदेशक सुशीला जाधव, अल्लाउद्दीन शेख, शाईन शेख, विजय बळीद उपस्थित होते.