21 किलोमीटर धावणारे भारतातील ठरले दुसरे अंध धावपटू
अहमदनगर (प्रतिनिधी)- डोळ्याने दिसत नसतानाही जिद्द चिकाटी व आत्मविश्वासाच्या जोरावर ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर हे अर्ध मॅरेथॉन 21 किलोमीटर धावणारे भारतातील दुसरे अंध धावपटू ठरले आहेत. त्यांनी हीं नेत्रदीपक कामगिरी डॉ. मिलिंद कांबळे यांच्या मदतीने पूर्ण केली. अंध असून एकवीस किलोमीटरची मॅरेथॉन पुर्ण करणारे ते पहिलेच व्यक्ती ठरले आहेत.
नगर रायझिंग तर्फे रविवारी नगर क्लब व कॅम्प परिसरात अर्ध मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी सहभाग घेतला. धोपावकर यांनी डॉ. मिलिंद कांबळे यांच्या मदतीने 21 किलोमीटरचे अंतर 3 तास 24 मिनिटात पूर्ण केले. धोपावकर पहाटेच्या अंधारात धावताना त्यांनी टॉर्च व पांढऱ्या दोरीचा वापर करीत कांबळे यांच्या मागे धावत त्यांनी ही शर्यत पूर्ण केली.
अर्ध मॅरेथॉन धावणारे अजय धोपावकर हे देशातील दुसरे व नगर जिल्ह्यातील एकमेव अंध धावपटू ठरले आहे. मुंबईचे अमरसिंग चावला हे अर्ध मॅरेथॉन करणारे पहिले अंध धावपटू आहेत. धोपावकर यांनी यापूर्वी पाच किलोमीटरच्या तीन, दहा किलोमीटरच्या चार, पंधरा किलोमीटरची एक, अशा धावण्याच्या शर्यती पूर्ण केल्या आहे. अजय धोपावकर हे गेल्या पंधरा वर्षापासून रेसिडेन्शियल हायस्कूलच्या मैदानावर नियमितपणे सराव करतात.
अमोल येनगंदुल, अजय रसाळ, प्रशांत मडके, सचिन नराल, अरुण ढाकणे, सचिन पुप्पाल, बाळकृष्ण येनगंदुल, मदन पुरोहित, राजेंद्र कडवा, राधेश्याम सपकाळे, गणेश म्याना यांचे त्याना सहकार्य लाभते. अजय धोपावकर यांचे आमदार संग्राम जगताप, नरेंद्र फिरोदिया व मॅरेथॉन कोच संदीप जोशी यांनी त्यांचा सत्कार करुन कौतुक केले.