1200 किलोमीटर अंतराची सायकल शर्यत केली 88 तासात पूर्ण
अहमदनगर (प्रतिनिधी)- देशात सर्वात खडतर मानली जाणारी गेट्स ॲाफ हेवन (जीओएच 2024) ही 1200 किलोमीटर अंतराची सायकल शर्यत नगर शहरातील सायकलपटू जस्मितसिंह वधवा यांनी निर्धारित वेळेत पूर्ण केली. त्यांनी हा प्रवास 88 तास 13 मिनिटांत पूर्ण केला. काश्मीर ते कन्याकुमारी व पॅरिस ब्रेस्ट पॅरिस सायकल राईड यशस्वी पूर्ण केल्यानंतर त्यांनी अहमदनगर मधून जिओएचफ फिनिशर होण्याचा पहिला मान मिळवला आहे.
बंगलुरू रॅडुनिअर्सतर्फे, दरवर्षी ही शर्यत भरविली जाते. यंदा बंगलुरु येथून 24 जानेवारीला शर्यतीला सुरुवात झाली. तिचा मार्ग कर्नाटक, तमिळनाडू व केरळ या तीन राज्यांतून होता. शर्यतीसाठी देशाच्या विविध राज्यांतून 101 सायकलपटूंनी आपला सहभाग नोंदविला.

हे आव्हान पार पाडण्यासाठी सायकलपटूंना उन, वारा, धुके, थंडी, सततचा चढ-उतार, आहार व झोपेवर नियंत्रण ठेवत स्वतःला सिद्ध करायचे होते. दक्षिण भारतातील खडतर मानले जाणारे प्रामुख्याने येरकाड, कुन्नूर, दोडाबेट्टा-उटी, कलपेट्टा, ईरिट्टी, सकलेशपुर व चिकमंगलूरू असे विविध 140 कि.मी.च्या घाटांचा प्रवासात समावेश होता. घनदाट जंगल, पश्चिम घाटातील दऱ्या-खोऱ्या, निसर्गरम्य वातावरण हे शर्यतीचे वैशिष्ट्य होते.
जवळपास 50 टक्के मार्ग हा याच भागातून गेला. यामध्ये, एकूण 14 हजार मीटर्सचे इलेव्हेशन पार करायचे होते. वधवा यांनी हा खडतर प्रवास पहिल्याच प्रयत्नात निर्धारित 90 तासांच्यावेळेच्या तुलनेत 88 तास व 13 मिनिटांत यशस्वीपणे पूर्ण केला. ही सायकल राईड यशस्वी केल्याबद्दल वधवा यांचे सायकलिंग असोसिएशन, एमआयडीसी मधील उद्योजक, व्यापारी वर्ग, घर घर लंगर सेवा व मित्र परिवाराने अभिनंदन करण्यात आले आहे.
शर्यतीची वैशिष्ट्ये
- स्वबळावरच शर्यत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
- बाहेरील मदत घेतल्यास संबंधित सायकलपटू अपात्र
- दीड किलोमीटरपासून उटीजवळचा तब्बल 60 किमीचा घाट
- संपूर्ण प्रवासात 11 चेक पॉईंट, तेथे नोंद करणे बंधनकारक
- कर्नाटक, तमिळनाडू, केरळमधून पुन्हा कर्नाटकात समारोप
काश्मीर ते कन्याकुमारी व पॅरिस ब्रेस्ट पॅरिस सायकल राईड पूर्ण केल्यानंतर एक मोठा आत्मविश्वास मनात होता. गेटस् ऑफ हेवन शर्यतीमध्ये पहिल्यांदाच भाग घेतला होता आणि पहिल्याच प्रयत्नात ही शर्यत निर्धारित वेळेत पूर्ण केल्याचा आनंद आहे. माझ्यादृष्टीने हा अतिशय आनंदाचा व वेगळा अनुभव देणारा क्षण आहे. -जस्मितसिंह वधवा (सायकलपटू, अहमदनगर)