• Thu. Jan 1st, 2026

सांस्कृतिक व भक्तीमय सोहळ्याने रंगला प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपचा हळदी-कुंकू

ByMirror

Jan 21, 2024

भजन-किर्तन करुन जय श्रीरामचा गजर

पारंपारिक वेशभूषेतील महिलांचे रॅम्पवॉक

अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने हळदी-कुंकू कार्यक्रमात भारतीय संस्कृतीचा जागर करण्यात आला. पारंपारिक वेशभूषेत आलेल्या महिलांनी रॅम्पवॉक करुन विविध कलागुणांचे सादरीकरण केले. तर यावेळी रंगलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रम व विविध स्पर्धेत नववधू पासून ते ज्येष्ठ महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.


प्रारंभी अयोध्या येथील राम मंदिरात होणाऱ्या प्रभू श्रीराम यांच्या मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त भजन-किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. या भक्तीमय कार्यक्रमाचा आनंद लुटून महिलांनी जय श्रीरामचा गजर केला. एकमेकींना हळदी-कुंकू लावून कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. किर्ती कोल्हे, विणा जगताप, साधिका देशमुख, कुसुम सिंग, स्वाती गुंदेचा, नम्रता दादी-नानी ग्रुपच्या अध्यक्षा जयाताई गायकवाड, प्रयास ग्रुपच्या अध्यक्षा अलकाताई मुंदडा, मायाताई कोल्हे, अनिता काळे, छाया राजपूत, ममता बोगावत, ज्योती कानडे, प्रतिभा भिसे, इंदू गोडसे, वंदना गारुडकर, सविता गांधी, मेघना मुनोत, जयश्री पुरोहित, ज्योत्स्ना कुलकर्णी, हिरा शहापुरे, मनीषा देवकर, उज्वला बोगावत, सुजाता पुजारी, साधना भळगट, निलीमा पवार, मंजुषा सावदेकर, संगिता गांधी, सोहनी पुरणाले, अर्चना बोरुडे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


प्रास्ताविकात अलकाताई मुंदडा यांनी महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली. पाहुण्यांचे स्वागत अनिता काळे यांनी केले. कुसुम सिंग म्हणाल्या की, संस्कृतीचा वारसा महिलांमुळे जपला जात आहे. कार्यक्रमात एकत्र येताना महिला संस्कार व संस्कृतीचा जागर करत असल्याचे सांगितले.


रंगलेल्या हळदी-कुंकूच्या सांस्कृतिक व भक्तीमय सोहळ्यात महिलांनी भक्तीगीतांवर ठेका धरला होता. तर निता प्रथम शेट्टी यांची गीतांची सुरेल मैफल रंगली होती. यावेळी महिलांसाठी विविध मनोरंजन, कौशल्यात्मक व बौध्दिक स्पर्धा रंगल्या होत्या. मेघना मुनोत यांनी घेतलेल्या विविध स्पर्धेत महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

पारंपारिक वेशभुषा स्पर्धेचे परीक्षण सुजाता देवळालीकर यांनी केले. विजेत्या महिलांना उपस्थितांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक महावीर ग्रुपचे राजेश भंडारी हे होते. तर विविध स्पर्धेचे बक्षीस डॉ. किर्ती कोल्हे यांच्या वतीने देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका कासट यांनी केले. आभार दिप्ती मुंदडा यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *