अखिल विश्व वारकरी परिषदेचे जिल्हाध्यक्ष पाचारणे यांचा उपक्रम
अखंड हरिनाम सप्ताहात किर्तन करणारे बाळू महाराजांना विठ्ठलाची भव्य मुर्ती देऊन सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- चिचोंडी पाटील (ता. नगर) येथे झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहात अखिल विश्व वारकरी परिषदेचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. साहेबराव यादवराव पाचारणे यांनी गावात वर्षभर काकड आरती करणाऱ्या महिलांना विठ्ठल रुक्मिणीची मुर्ती भेट दिली. तर सप्ताहामध्ये किर्तनातून भाविकांना मंत्रमुग्ध करणारे बाळू महाराज गिरगावकर यांना 3 फुटाची विठ्ठलाची मुर्ती देऊन त्यांचा सन्मान केला.
नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गावात विठ्ठल रुक्मिणी सप्ताह कमिटीच्या वतीने मागील 35 वर्षांपासून चालत आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. गावात सप्ताहनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमासह किर्तनाचा भाविकांनी लाभ घेतला. या सप्ताहात ह.भ.प. साहेबराव पाचारणे यांनी वर्षभर काकडा आरती करणारे 20 महिलांना माजी जिल्हा परिषद सदस्या प्रतिभाताई पाचपुते यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीच्या मुर्तीचे वाटप केले. यावेळी ह.भ.प. रामदास महाराज रक्ताटे, राऊत महाराज पिंपळा, संजय महाराज घोडके, विठ्ठल रुक्मिणी सप्ताह कमिटी आणि चिचोंडी पाटील पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बाळू महाराज गिरगावकर म्हणाले की, विठ्ठलाची भक्ती करताना भक्ताकडून भगवंताची मिळालेली भेट अमूल्य आहे. या भेटीचे कोणत्याही प्रकारे मुल्य करता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. प्रतिभाताई पाचपुते यांनी धार्मिकतेतून गावाला विकासात्मक दिशा मिळत असते. तर भावी पिढीवर संस्कार घडत असते. सप्ताहाच्या माध्यमातून युवा पिढीवर संस्कार घडत असल्याचे त्यांनी सांगितले. तर पाचारणे यांनी राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.
बाजीराव हजारे म्हणाले की, गावातील सामाजिक व धार्मिक कार्यात साहेबराव पाचरणे यांचे नेहमीच सक्रीय योगदान असते. गावात वर्षभर काकडा आरती करणाऱ्या महिलांचा त्यांनी केलेला सन्मान कौतुकास्पद आहे. धार्मिक कार्याला सामाजिक उपक्रमांची जोड देऊन ते राबवित असलेले कार्य दिशादर्शक असल्याचे, ते म्हणाले.
साहेबराव पाचारणे म्हणाले की, भगवंताची ओढ निर्माण झाल्यास भक्ती मार्ग फुलत जातो. विठ्ठलाची भक्ती करताना जीवन सार्थकी लागून उद्देश सफल होतो. विठ्ठलाची भक्ती करणाऱ्या भक्तांना भगवंताची मूर्ती देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. सप्ताह कमिटीच्या वतीने पाचारणे यांचे आभार मानण्यात आले.