स्वामीनी जेजूरकर ठरली राज्यात प्रथम; तर तांबे व सोनवणे पटकाविले तृतीय क्रमांक
अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यस्तरीय शालेय राज्य कुराश स्पर्धेत राहुरी कृषी विद्यापीठचे सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या खेळाडूंनी नेत्रदीपक यश संपादन केले. या स्पर्धेत शाळेची खेळाडू स्वामीनी जेजूरकर हिने राज्यात प्रथम तर साक्षी तांबे व तनुजा सोनवणे राज्यात तिसरे स्थान पटकाविले. स्वामिनीची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुराश्य स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व कुराश असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने 14, 17, 19 वर्षे वयोगटातील मुला मुलींच्या शालेय राज्यस्तरीय स्पर्धा शहरातील वाडिया पार्क क्रीडा संकुल येथे उत्साहात पार पडले. यामध्ये राज्यातील मोठ्या संख्येने खेळाडू सहभागी झाले होते. सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय राहुरी कृषी विद्यापीठाची स्वामिनी गोरक्षनाथ जेजुरकर हिने अंतिम सामन्यात अमरावतीच्या खेळाडूला पराभूत करून सुवर्णपदक मिळवले. तसेच विद्यालयाच्या तनुजा सोनवणे व साक्षी तांबे यांनी कांस्यपदकाची कमाई केली.
विजयी झालेल्या स्वामिनी, तनुजा व साक्षी या तीनही विद्यार्थिनी क्रीडा शिक्षक घन:श्याम सानप यांच्याकडे कुराश व ज्युदोचे प्रशिक्षण घेत आहेत. या तीनही विद्यार्थिनींच्या राज्यस्तरीय स्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू तथा सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, सचिव डॉ. महानंदजी माने, विद्यार्थी कल्याण अधिकारी महावीरसिंग चौहान, खजिनदार महेश घाडगे, विद्यालयाचे प्राचार्य अरुण तुपविहिरे, उपमुख्यद्यापक बाळासाहेब डोंगरे, पर्यवेक्षक मनोज बावा, संतोष जाधव यांच्यासह सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.