वासुदेव, वाघ्या, मुरळी, बहुरूपी, भारुड, शाहिरी, आराधी, पोतराजांचे होणार सादरीकरण
लोककलेतून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडून येते -शिवाजी कर्डिले
अहमदनगर (प्रतिनिधी)- लोककलेतून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडून येते. लोप पावत चाललेल्या लोककला जतन करण्यासाठी लोककलेला प्रोत्साहन व व्यासपीठ निर्माण करुन देण्याची गरज आहे. लोककला ही समाज जागृतीचे माध्यम असल्याची भावना माजी मंत्री तथा जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजी कर्डिले यांनी व्यक्त केली.
सावेडी येथील कोहिनूर मंगल कार्यालयात 14 जानेवारी रोजी लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर संयोजन समितीच्या शिष्टमंडळाने कर्डिले यांची बुऱ्हाणनगर (ता. नगर) येथे भेट घेऊन कार्यक्रमाची माहिती दिली. यावेळी सुहास सोनवणे, दत्ता वामन, तनीज शेख, आरती शिंदे, चंद्रकांत ठोंबे, शाहीर कान्हू सुंबे, ॲड. महेश शिंदे, विनोद साळवे आदी उपस्थित होते.
पुढे कर्डिले म्हणाले की, नवीन पिढीसाठी लोककला जिवंत ठेवणे आवश्यक आहे. वासुदेव, वाघ्या, मुरळी, सनईवाले, बहुरूपी, भारुड, शाहिरी, आराधी, पोतराज आदी लोककलावंत दुर्मिळ होत चाललेले आहेत. या महोत्सवाच्या माध्यमातून नव्या पिढीला प्रत्यक्षात लोक कला अनुभवता येणार आहे. लोक कलावंतांनी देखील या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
या लोककला महोत्सवासाठी सहाय्यक समाज कल्याण आयुक्त राधाकिसन देवढे, अश्विनी वाघ, अनिल साळवे, प्रा. सुनील मतकर, धीरज ससाणे, डॉ. अमोल बागुल, रमेश गाडगे, संध्या देशमुख, कावेरी कैदके, गणेश बनकर, दिनेश शिंदे, बाळासाहेब नेटके, राजू पंडित, संजय साळवे आदी प्रयत्नशील आहेत.