अहमदनगर (प्रतिनिधी)- इंडियन पॉवरलिफ्टिंग फेडरेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या 44 व्या नॅशनल चॅम्पियनशीप इक्वीप ज्युनियर मास्टर्स ॲण्ड ओपन डेडलिफ्ट चॅम्पियनशीप स्पर्धेत नगरच्या अनुराधा मिश्रा यांनी रौप्य पदक पटकाविले. या स्पर्धेत विविध राज्यातून मोठ्या संख्येने खेळाडू सहभागी झाले होते.

नवी मुंबई उरण येथे ॲमेचर पॉवरलिफ्टिंग असोसिएशन महाराष्ट्र ॲण्ड द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या द्रोणगिरी क्रीडा महोत्सवात ही स्पर्धा पार पडली. महिला खेळाडूंनी पॉवरलिफ्टिंग मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केले. अनुराधा मिश्रा यांनी खुल्या 63 किलो वजन गटात पॉवरलिफ्टिंग, बेंच प्रेस व डेडलिफ्ट मध्ये रौप्य पदकाची कमाई केली.
अनुराधा मिश्रा यांना द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घराट यांच्या हस्ते मेडल व चषक प्रदान करुन सन्मान करण्यात आला. संघ व्यवस्थापक म्हणून दगडू गव्हाणे यावेळी उपस्थित होते. मिश्रा या सावेडी येथील जिम स्ट्राईकर मध्ये प्रशिक्षक स्वप्निल मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.