अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील मल्लखांबपटू गौरी गोपाल गौड हिची जयपूर येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ अंतर्गत आयोजित मल्लखांब स्पर्धेसाठी नुकतीच निवड झाली आहे. यापूर्वी तिने आंतरशालेय राज्यस्तरीय योगा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तर राष्ट्रीय स्तरावर एरियल सिल्क या स्पर्धेत सलग तीन वर्ष सुवर्ण पदकाची ती मानकरी ठरली आहे.

गौरी गौड ही न्यू आर्टस कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयात बी.बी.ए. द्वितीय वर्षात शिकत आहे. ती महावीर मल्लखांब व योगा ट्रेनिंग सेंटर येथे मागील दहा वर्षांपासून योगा व मल्लखांब या खेळाचा अविरत सराव करत आहे. प्रशिक्षक उमेश झोटिंग, प्रणिता तरोटे, अप्पा लाढाणे यांचे मार्गदर्शनाखाली तिला लाभत आहे. या यशाबद्दल मानधना ट्रस्टचे मोहन मानधना व न्यू आर्ट्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्करराव झावरे यांनी तिचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या यशासाठी कॉलेजचे फिजिकल डायरेक्टर शरदचंद्र मगर यांचे तिला विशेष सहकार्य लाभले. या यशाबद्दल गौड हिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.