वसतिगृहातील मुलींना थंडीच्या पार्श्वभूमीवर स्वेटरचे वाटप
सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी घडवले देशातील विविध संस्कृतीचे दर्शन
अहमदनगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर महाराष्ट्रासह देशातील विविध संस्कृतीचे दर्शन घडविले. छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्य गाथेचे सादरीकरण करताच सभागृहात शिवाजी महाराजांचा एकच जयघोष झाला. तर मोबाईलच्या माध्यमातून सोशल मीडियात गुंतलेल्या सध्याचे पिढीवर भाष्य केले. विविध हिंदी-मराठी गाण्यावर रंगलेल्या नृत्याने सांस्कृतिक कार्यक्रमात रंग भरला.

लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात झालेल्या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन मराठी विषय संघटनेचे राज्य सहसचिव डॉ. स्मिता भुसे यांच्या हस्ते झाले. रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, अर्जुनराव पोकळे, अंबादास गारुडकर, उमेश धस, कैलासराव मोहिते, विष्णूपंत म्हस्के, शामराव व्यवहारे, माध्यमिकच्या मुख्याध्यापिका छाया काकडे, प्राथमिकचे मुख्याध्यापक शिवाजी लंके आदींसह शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविकात मुख्याध्यापिका छाया काकडे यांनी पारंपारिक शिक्षणाला अद्यावत शिक्षणाची जोड देऊन गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडविण्यासाठी शाळेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती दिली.
डॉ. स्मिता भुसे म्हणाल्या की, पालकांनी आपल्या मुलांची तुलना इतर मुलांशी करु नये. प्रत्येक मुलांमध्ये विशेष कलागुण दडलेले असतात. ते कलागुण ओळखून प्रोत्साहन दिल्यास त्यांना यशाचे मार्ग सापडणार आहे. मात्र मोबाईलमध्ये सध्याचे मुले गुंतले जात असताना त्यांच्या मधील कलागुण लोप पावत आहे. मोबाईलने त्यांचा शारीरिक व वैचारिक विकास खुंटत असून, विद्यार्थ्यांना मोबाईलपासून लांब ठेवण्याचे त्यांनी आवाहन केले.
दादाभाऊ कळमकर म्हणाले की, बहुजन समाजाला घडविण्याचे कार्य रयत शिक्षण संस्था करीत आहे. स्पर्धेत गुणवत्तेला प्राधान्य देऊन संस्थेतील सर्व शाळांची वाटचाल सुरू आहे. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालय गुणवत्तेतून पुढे येत असून, शाळेत राबविण्यात येणाऱ्या कला, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.

कला, क्रीडा, शैक्षणिक व विविध स्पर्धेत नैपुण्य मिळवणाऱ्या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तर मुख्याध्यापिका छाया काकडे यांनी कै. साहेबराव काकडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रयतच्या जिजामाता कन्या निवास वसतिगृहातील मुलींना थंडीच्या पार्श्वभूमीवर स्वेटरचे वाटप केले. गणेश वंदनाने सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात झाली. विविध गीतांवर नृत्याचे बहारदार सादरीकरण करुन, चिमुकल्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित पालक, विद्यार्थी व शिक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांच्या कला गुणांना दाद दिली. पाहुण्यांचे स्वागत व परिचय मुख्याध्यापक शिवाजी लंके यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता पिसाळ यांनी केले. आभार महादेव भद्रे यांनी मानले.