पद्मश्री पोपट पवार यांच्या हस्ते निवडपत्र देऊन सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात होणाऱ्या सहाव्या राज्यस्तरीय सावित्री ज्योती महोत्सवाच्या स्वागत अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते तथा जिल्हा सहकारी बँकेचे व्यवस्थापक सुहासराव सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पद्मश्री पोपट पवार यांच्या हस्ते सोनवणे यांना निवडीचे पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे, राज्य क्रीडा मार्गदर्शक विशाल गर्जे, ज्ञानेश्वर खुरांगे, क्रीडा अधिकारी भाऊराव वीर, नेहरु युवा केंद्राचे राज्य उपनिदेशक शिवाजी खरात, जिल्हा कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, उपविभागीय कृषी अधिकारी पोपटराव नवले, शहर बार असोसिएशनचे खजिनदार ॲड. सुनील तोडकर, समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. डॉ. रमेश वाघमारे, प्रगत महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य नुरिल भोसले, सावित्री ज्योती महोत्सवाचे संयोजक ॲड. महेश शिंदे, पोपट बनकर, निकिता वाघचौरे, कावेरी कैदके, आरती शिंदे, वैशाली कुलकर्णी, दिनेश शिंदे आदी उपस्थित होते.
जय युवा अकॅडमी, महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा कार्यालय, नेहरू युवा केंद्र, एकात्मिक सेवा योजना प्रकल्प, समाज कल्याण विभाग, जिल्हा रुग्णालय, महानगरपालिका, समाजकार्य महाविद्यालय, जय असोसिएशन ऑफ एनजीओ (महाराष्ट्र राज्य) च्या वतीने 11 ते 14 जानेवारी दरम्यान सावेडी येथील गुलमोहर रोड, कोहिनूर मंगल कार्यालयात सहाव्या राज्यस्तरीय सावित्री ज्योती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सोनवणे यांच्या सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांची महोत्सवाच्या स्वागताध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे ॲड. महेश शिंदे यांनी सांगितले. सुहास सोनवणे यांनी शाहू, फुले, आंबेडकर यांचा वैचारिक वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी विविध उपक्रमाच्या माध्यमातून योगदान देणार असल्याचे स्पष्ट केले.
भिंगार येथील रहिवासी असलेले सोनवणे मागील तीन दशकापेक्षा जास्त काळ सामाजिक क्षेत्रात योगदान देत आहेत. सुरुवातीला त्यांनी एव्हिएशन डिफेन्स फोर्समध्ये देश सेवा केली. त्यानंतर सन 1991 पासून अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. नोकरी सांभाळून समाजसेवेचा वसा ते अविरतपणे जोपासत आहे. स्वागताध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.