• Tue. Jul 22nd, 2025

ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात श्री नवनाथ पायी दिंडीचे आळंदीकडे प्रस्थान

ByMirror

Dec 5, 2023

डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने दिंडीला शुभेच्छा

भक्तीतून जीवनात शक्ती निर्माण होते -पै. नाना डोंगरे

अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील श्री नवनाथ पायी दिंडीचे ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात व टाळ मृदंगाच्या गजरात श्री क्षेत्र आळंदीकडे प्रस्थान झाले. गावात भक्तीमय वातावरणात वारकरी या पायी दिंडी सोहळ्यात सहभागी होऊन मार्गस्थ झाले.


परमपूज्य वै. ह.भ.प. विठ्ठल बाबा देशमुख व वै. ह.भ.प. बाळकृष्ण महाराज भोंदे यांच्या आशीर्वादाने तर ह.भ.प. विठ्ठल महाराज खळदकर यांच्या मार्गदर्शनाखाली या दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, दिंडीचे हे अकरावे वर्ष आहे. या दिंडीत गावाच्या पंचक्रोशीतील वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.


पै. स्व. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने दिंडीला शुभेच्छा देण्यात आल्या. डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांनी विणेकरी ह.भ.प. भाऊसाहेब जाधव व ह.भ.प. संदेश जाधव यांचा सत्कार केला. यावेळी श्री नवनाथ पायी दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष ह.भ.प. एकनाथ डोंगरे, सचिव लक्ष्मण चौरे, डॉ. विजय जाधव, दीपक बोडखे, भागचंद जाधव, दत्तू फलके, बन्सी जाधव, ह.भ.प. माऊली मोकाशे, ह.भ.प. गोकुळ कदम, ह.भ.प. गणेश मापारी, गणेश पवार, तनपुरे बाबा चौधरी, चंद्रकांत जाधव, लता फलके, विमल शिंदे, भरत बोडखे,संदीप येणारे, अरुण फलके, संजय कापसे, अजय ठाणगे, सुमन फलके, सुभद्रा फलके आदी उपस्थित होते.


पै. नाना डोंगरे यांनी भक्तीतून जीवनात शक्ती निर्माण होते. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून समाजात संस्कृती व संस्कार रुजवले जात आहे. पायी दिंडीतून एक वेगळी ऊर्जा मिळत असून, भक्तीने भारावलेले वारकरी दिंडीत सहभागी होऊन आपल्या भगवंताला भेटण्यासाठी जात असल्याचे त्यांनी सांगून, आळंदीला निघालेल्या वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.


दिंडीच्या अग्रभागी वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष करणारे झेंडेकरी, पांढऱ्या पोशाखात सहभागी भाविक, भजनी मंडळी, फुलांनी सजवलेले रथ व डोक्यावर तुळशी, कळस घेतलेल्या महिला आळंदीला निघाल्या आहेत. दिंडीत दररोज हरिपाठ, भारुड, किर्तन व प्रवचनांच्या कार्यक्रमांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *