बँकिंग क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याचा सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील सुहास काशीनाथ सोनावणे यांना बँकिंग क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने माजी राष्ट्रपती डॉ. जाकीर हुसैन उत्कृष्ट समाजसेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय येथे अल्पबचत भवन मध्ये झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात सोनवणे यांना नायब तहसिलदार देवेंद्र चंदनकर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.
या कार्यक्रमास माजी आमदार कैलास पाटील, क्रीडा समन्वयक फारुक शेख, उपविभागीय अधिकारी मनोज देशमुख, डॉ. हाजी हारुन शेख, संस्थेचे अध्यक्ष फारुख शाह नौमानी, शकिल देशपांडे, सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे, शबनम डफेदार, विकास झेंडे, मोहम्मद फारुक, अनिता चौधरी आदी उपस्थित होते.
सोनावणे हे जिल्हा सहकारी बँकेत अनेक वर्षापासून कार्यरत असून, सध्या ते मेहेकरी (ता.नगर) शाखेत व्यवस्थापक म्हणून काम पाहत आहे. त्यांनी शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य व मुंबई, नांदेड, भोपाळ, हैदराबाद येथे बँकेच्या माध्यमातून दिलेल्या सेवेबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यात मागील पंधरा वर्षापासून सामाजिक कार्य सुरु आहे. दरवर्षी संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य व निस्वार्थ भावनेने सामाजिक कार्य करणाऱ्यांना पुरस्काराने गौरविण्यात येते. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल सोनावणे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
