• Thu. Jul 2nd, 2026

Mirrornews24

Marathi News

बाबासाहेब बोडखे यांना आदर्श माध्यमिक शिक्षक पुरस्कार प्रदान

ByMirror

Nov 22, 2023

पद्मश्री पोपट पवार यांनी केले बोडखे यांच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचे कौतुक

अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे यांना आदर्श माध्यमिक शिक्षक पुरस्कार पद्मश्री पोपट पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. उपक्रमशील शिक्षक तथा शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्‍नांवर आवाज उठविणारे बोडखे यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन युवा ग्रामीण पत्रकार संघ आणि सत्यजित महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांना पुरस्कार देण्यात आला.


सांडवा फाटा (ता. नगर) येथे झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, शिक्षक परिषदेचे प्रांताध्यक्ष प्रा. सुनिल पंडित, संचालक आप्पासाहेब शिंदे, महेंद्र हिंगे, कोषाध्यक्ष बबन शिंदे, प्रसाद सामलेटी, राजू बोडखे, सरपंच वैभव बोठे, प्रा. संभाजी पवार, अन्सार शेख, श्‍याम कांबळे, समीर मन्यार, आफताब शेख आदी उपस्थित होते.


पद्मश्री पोपट पवार यांनी बाबासाहेब बोडखे यांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सुरु असलेल्या कार्याचे कौतुक करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. बोडखे हे पंडित नेहरू हिंदी विद्यालयामध्ये माध्यमिक शिक्षक आहेत. त्यांनी शिक्षक परिषदेच्या माध्यमातून शिक्षक, शिक्षकेतरांचे विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरु आहे.

सलग दोन टर्म मध्ये ते माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक निवडून आले आहेत. कोरोना काळात धुणी-भांडी करणाऱ्या महिलांना अन्नधान्य व किराणा देऊन त्यांना आधार देण्याचे काम केले. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा या दृष्टीने भाजीपाला व्यवसायिकांना स्वखर्चाने मास्क आणि हॅण्डग्लोव्हज पुरवले. कोरोना काळात त्यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाच्या सोप्या भाषेत स्वाध्याय पुस्तिका तयार करून विद्यार्थ्यांना वाटप केल्या. कोरोनात पालकत्व गमावणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवत उच्च शिक्षण होईपर्यंत निराधार विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारले.


कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी त्यांनी एक टेम्पोभरून धान्य व सुमारे 65 हजार रुपयाचे शैक्षणिक साहीत्य दिले होते. गरजू विद्यार्थ्यांना दरवर्षी ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करत असतात. वंचित, मुकबधीर, मनोविकलांग, निराधार व आर्थिक दुर्बल घटकांना सातत्याने आधार देण्याचे काम करत आहे. गरजू विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी 5 सायकल दिल्या. दरवर्षी ते दिव्यांग निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना कपडे, अन्नधान्य आणि किराणा वाटप करत असतात. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *