विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी मैदानात आणण्याची गरज -पै. नाना डोंगरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- खेळाने विद्यार्थ्यांमध्ये यश-अपयश पचविण्याची शक्ती निर्माण होते. विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी मैदानात आणण्याची गरज आहे. मोबाईलमध्ये गुंतलेल्या विद्यार्थ्यांना सर्वांगीन विकास खुंटला आहे. जीवनात व मैदानात घाम गाळल्याशिवाय यश मिळणार नसल्याचे प्रतिपादन डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी केले.
निमगाव वाघा (ता. नगर) येथील अहमदनगर शोतोकान कराटे-डो असोसिएशनच्या वतीने मुला-मुलींसाठी घेण्यात आलेल्या कराटे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या खेळाडूंना बेल्ट व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी डोंगरे बोलत होते. याप्रसंगी बिरोबा देवस्थानचे भगत नामदेव भुसारे, प्रशिक्षक सुरेश जाधव आदींसह खेळाडू उपस्थित होते.
पुढे पै. डोंगरे म्हणाले की, आयुष्यातील कुठल्याही परीक्षेत यश मिळविण्यासाठी शॉर्टकट नसतो. मनात ध्येय गाठण्याची जिद्द असल्यास ध्येयप्राप्ती झाल्याशिवाय राहत नसल्याचे त्यांनी सांगितले. नामदेव भुसारे यांनी खेळाडूंना पुढी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रशिक्षक सुरेश जाधव यांनी कराटे खेळातून शारीरिक व्यायाम होऊन स्वसंरक्षणाचे धडे देखील मिळतात. शिक्षणाबरोबर खेळाला देखील महत्त्व आले आहे. अनेक मुला-मुलींनी खेळातून आपले करियर घडविले आहे. मुलांना मैदानी खेळाची आवड निर्माण होण्याच्या उद्देशाने, स्वसंरक्षणासाठी व शारीरिक तंदुरुस्तीसाठी कराटे सर्वोत्तम असल्याचे सांगितले. या प्रशिक्षण वर्गाला गावातील मुला-मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यामध्ये 39 विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले.