ज्युरी सदस्य म्हणून जबाबदारी पार पाडणारे तुरंबेकर ठरल्या देशातील पहिल्या महिला
एएफसीने तुरंबेकर यांची उजबेकिस्तान दौऱ्यासाठी केली निवड
अहमदनगर (प्रतिनिधी)- आशियातील खेळाडू, प्रशिक्षक, सदस्य संघटना यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल दिल्या जाणाऱ्या एएफसी ॲन्युअल अवॉर्डच्या परीक्षण समितीमध्ये महिला फुटबॉलपटू तथा प्रशिक्षिका अंजू तुरंबेकर यांची निवड करण्यात आली होती. हा पुरस्कार सोहळा नुकताच दोहा (कतार) येथे पार पडला. तुरंबेकर या शहरातील नवोदित खेळाडूंना फुटबॉलचे धडे देत आहेत.
या अवार्ड निवडीच्या ज्युरी सदस्य म्हणून जबाबदारी पार पाडणारे तुरंबेकर या भारतातील पहिल्या महिला ठरल्या आहेत. त्यांच्याबरोबरच आशियातील फुटबॉल क्षेत्रातील इतर दिग्गज व्यक्तींचा देखील समावेश होता. तुरंबेकर यांच्यावर काही श्रेणींमधील अवॉर्ड विजेता निवडण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. या पुरस्कार सोहळ्यात एएफसी प्लेयर ऑफ द इयर आणि एएफसी महिला खेळाडूंना पुरस्काराने गौरविण्यात आले.
तुरंबेकर हे शहरात सावेडी व केडगाव येथे फुटबॉल खेळाडूंना प्रशिक्षण देत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक फुटबॉलपटू सराव करत आहे. तुरंबेकर यांनी भारत देश तसेच इतर आशियाई देशांचा ग्रासरूट फुटबॉल विकसित करण्यासाठी मोलाचा हातभार लावला आहे.
भारत देशाच्या ग्रासरूट डेव्हलपमेंट हेड आणि इंस्ट्रक्टर म्हणून जवळजवळ 7 वर्षे कार्य पाहिले आहे. सध्या एएफसी ने त्यांची उजबेकिस्तान या देशासोबत कार्य करण्यासाठी नियुक्ती केली आहे. यासाठी त्यांचा 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत उजबेकिस्तानला दौरा देखील होणार आहे. या कार्याबद्दल तुरंबेकर यांचे अकॅडमीचे शाखा प्रमुख पल्लवी सैंदाणे, प्रशिक्षक अक्षय बोरुडे, अभिषेक सोनवणे यांनी अभिनंदन केले आहे.