• Sat. Mar 15th, 2025

निमगाव वाघा गावाच्या विकासात्मक वाटचालीत योगदान देणाऱ्या भूमिपुत्राचा नागरी सन्मान

ByMirror

Jul 30, 2023

एकता फाउंडेशनच्या वतीने उद्योजक राजेंद्र शिंदे यांना भूमिपुत्र सन्मान गौरव पुरस्कार प्रदान

समाजाच्या ऋणातून उतराई होण्याची प्रत्येकाने योगदान देण्याची गरज -अतुल फलके

अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) गावाच्या विकासात्मक वाटचालीत निस्वार्थ भावनेने योगदान देऊन सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातील विकास कामे मार्गी लावल्याबद्दल उद्योजक राजेंद्र काशिनाथ शिंदे यांना एकता फाऊंडेशन व ग्रामस्थांच्या वतीने भूमिपुत्र सन्मान गौरव पुरस्कार देण्यात आले.


एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सोसायटीचे संचालक अतुल फलके यांनी शिंदे यांना मानपत्र देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी रामदास पवार, अरुण अंधारे, विकास कापसे, रवींद्र जाधव, विकास जाधव, सोमनाथ फलके आदींसह सर्व आजी-माजी सैनिक, पी.आर.एम. सोल्युशन कंपनीचे सदस्य, आजी-माजी सरपंच उपसरपंच, ग्रामपंचायत व सोसायटी सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अतुल फलके म्हणाले की, समाजाच्या ऋणातून उतराई होण्याची प्रत्येकाने योगदान देण्याची गरज आहे. समाजात विकास झाल्यानंतर ज्या गावात वाढलो, शिकलो त्याची जाणीव ठेवण्याची गरज आहे. सामाजिक जाणीव ठेऊन उद्योजक राजेंद्र शिंदे यांनी गावासाठी केलेले कार्य प्रेरणा देणारे आहे. उद्योग, व्यवसाय करत असताना गावाच्या विकासासाठी त्यांनी निस्वार्थ भावनेने योगदान दिले. आपल्या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी गावाचा विकास केला आहे. गावातील मुलांच्या उज्वल भवितव्यासाठी शैक्षणिक उपक्रमात देखील त्यांनी सहयोग दिला असून, त्यांचे कार्य गावासाठी भूषणावह असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना राजेंद्र शिंदे म्हणाले की, गावात झालेल्या सन्मानाने भारावलो असून, गावाचा सर्वांगीन विकास हाच एकमेव दृष्टीकोन ठेवून विविध माध्यमातून मदत करण्यात आली आहे. झालेल्या या सन्मानाने आणखी कार्य करण्याचे बळ मिळणार असून, जबाबदारी वाढली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


राजेंद्र शिंदे हे पी.आर.एम. सोल्युशन कंपनीचे प्रमुख असून, त्यांनी कंपनीच्या सीआर फंडातून गावाचा कायापालट केला आहे. गावात ग्रामस्थांसाठी रुग्णवाहिका व शववाहिका उपलब्ध करून दिली आहे. तसेच जगदंबा देवी मंदिराच्या विकासात्मक कामासाठी योगदान दिले आहे. तर गावातील हनुमान मंदिर, भैरवनाथ मंदिर व बिरोबा मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी भरीव आर्थिक मदत दिली आहे. निमगाव वाघा गावठाण परिसरात वृक्षरोपण करुन ती वाढवली आहे. नवनाथ विद्यालयासाठी डिजिटल क्लासरूम उभारण्याचा व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची नवीन इमारत बांधून देण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. तर ग्रामपंचायत कार्यालय दुरुस्तीसाठी आर्थिक निधी दिला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन संस्थेच्या वतीने त्यांना भूमिपुत्र सन्मान गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *