अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील गुरू अर्जुन सामाजिक प्रतिष्ठान संचलित घर घर लंगर सेवेच्या वतीने उत्तराखंड येथील श्री हेमकुंड साहेब गुरुद्वारा ट्रस्ट करीता अॅल्युमिनियमचे पंधराशे लिटरचे 20 ऑक्सिजन सिलेंडर व ब्लँकेट सेवादाराच्या वतीने भाविकांच्या सेवेसाठी पाठविण्यात आले.
कोरोना काळात शहरात ऑक्सिजनची गरज भासत असताना घर घर लंगर सेवेच्या सेवा कार्याला हातभार लावून दानशूर व्यक्तींनी अॅल्युमिनियमचे पंधराशे लिटरचे 20 सिलेंडर, 12 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर व तेराशे पोर्टेबल ऑक्सिजन कॅन मदत उपलब्ध करुन दिली होती. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव संपला असताना व सध्या ऑक्सिजनसाठी या वस्तूंची गरज भासत नसल्याने त्यापैकी पंधराशे लिटरचे 20 सिलेंडर श्री हेमकुंड साहेब गुरुद्वारासाठी पाठविण्यात आले. यावेळी हरजितसिंह वधवा, जनक आहुजा, प्रीतपालसिंह धुप्पड, प्रशांत मुनोत, मनोज मदान, जस्मितसिंह वधवा, दलजितसिंह वधवा, सनी वधवा, ब्रीजपालसिंग सलुजा आदी उपस्थित होते.
जनक आहुजा म्हणाले की, जेथे गरज तेथे लंगर सेवेच्या सेवादारांनी सेवा करण्याचे काम केले आहे. गरज ओळखून ही सेवा करण्यात आली असून, सेवादार विविध माध्यमातून आपली सेवा देत असल्याचे त्यांनी सांगितले. हरजितसिंह वधवा यांनी ऑक्सिजन सिलेंडरचा श्री हेमकुंड साहेब गुरुद्वारा येथे उपयोग होणार असून, गरजू भाविकांना त्याचा लाभ मिळणार असल्याचे स्पष्ट केले.
उत्तराखंड येथील श्री हेमकुंड साहेब येथे ठराविक काळात भाविक दर्शनास येत असतात. हिमालयात उंच शिखरावर असलेल्या त्या ठिकाणी लहान-मोठी दुर्घटना घडत असते, किंवा भाविकांना श्वास घेण्याचा त्रास झाल्यास ऑक्सिजन सिलेंडरची नेहमीच गरज भासत असते. ही गरज ओळखून लंगर सेवेकडे असलेल्या ऑक्सिजन सिलेंडरचा योग्य ठिकाणी उपयोग होण्यासाठी सदर उपक्रम राबविण्यात आला आहे. तर भाविकांना ब्लँकेटची सेवा देखील करण्यात आली आहे.
