सामाजिक बांधिलकीची अनोखी सेवापूर्ती; बँक ऑफ महाराष्ट्राचे देशमुख सेवानिवृत्त
ज्या गावात कार्य केले, त्याच गावातील शाळेची गरज ओळखून दिलेल्या भेटीने ग्रामस्थही भारावले
अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध होवून त्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी वाकोडी (ता. नगर) येथील जिल्हा परिषद शाळेला जल शुध्दीकरण यंत्राची भेट देण्यात आली. याच गावातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत विशेष सहाय्यक असलेले श्रीकांत विठ्ठल देशमुख यांनी आपल्या सेवापूर्तीनिमित्त शिक्षक असलेल्या आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ हा सामाजिक उपक्रम राबविला. ज्या गावात कार्य केले, त्याच गावातील शाळेची गरज ओळखून दिलेल्या भेटीने ग्रामस्थही भारावले.
वाकोडी येथील जिल्हा परिषद शाळेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हरिभाऊ कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी विस्तार अधिकारी निर्मला साठे, केंद्रप्रमुख उदयकुमार सोनावळे, सरपंच मंगलताई गवळी, उपसरपंच आदिनाथ मोढवे, मुख्याध्यापिका जयश्री ठुबे, शिक्षक नेते बापूसाहेब तांबे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू गवळी, संतोष खांदवे, हौशाबापू गवळी, शैनेश्वर पवार, बंटी पवार, गणेश तोडमल, मिरजगाव सोसायटीचे चेअरमन सदाबापू शिंदे, महाराष्ट्र बँक वाकोडी फाट्याचे स्वप्निल जाधव, मार्केट कमिटीचे संचालक सुभाष निमसे, दत्तात्रय निक्रड, कौस्तुभ देशमुख, तेजस्विनी देशमुख, रंजना देशमुख, जयश्री देशमुख, मंदाकिनी देशमुख, अनिल देशमुख, वंदना देशमुख, पुरुषोत्तम रसाळ, अपेक्षा देशमुख, चिराक्ष देशमुख, संजय पवार आदींसह ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविकात बापूसाहेब तांबे म्हणाले की, सन 1988 पासून महाराष्ट्र बँकेत कार्यरत असलेले श्रीकांत देशमुख 2015 साली वाकोडी फाटा येथील शाखेत रुजू झाले. त्यांनी ग्रामस्थांना अधिक चांगल्या पध्दतीने सेवा देण्याचे कार्य केले. प्रत्येक विद्यार्थी हा पाण्याची बाटली घेऊन शाळेत येत असतो. गावातील पाणी क्षारयुक्त असल्याने त्याचे परिणाम मुलांच्या आरोग्यावर होत असताना ही गोष्ट लक्षात घेऊन देशमुख यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी केलेली मदत कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
हरिभाऊ कर्डिले म्हणाले की, गावातील शाळांना मदतीच्या उपक्रमाची लोकचळवळीत रुपांतर होणे आवश्यक आहे. देशमुख यांनी राबविलेला उपक्रम प्रेरणा देणारा आहे. अनेकांचे वाढदिवस, सण, उत्सव डिजे, फटाक्यांची आतषबाजी व तोफेच्या सलामीने करण्यापेक्षा त्यातील निम्मा खर्च शाळेसाठी मदत म्हणून केला पाहिजे. मुलांना शाळेत चांगल्या सुविधा निर्माण झाल्यास त्यांचे भवितव्य घडणार आहे. यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विशेष अभियान राबवून ग्रामस्थांकडून वाढदिवस, सण, उत्सव काळात शाळेसाठी मदत गोळा केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषद शाळेत नव्याने रुजू झालेल्या मुख्याध्यापिका जयश्री ठुबे यांचा व सेवापूर्तीनिमित्त देशमुख यांचा ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापिका ठुबे यांनी शाळेसाठी अकरा हजार रुपयाची देणगी दिली. विस्तार अधिकारी निर्मला साठे म्हणाल्या की, एका बँकेचा अधिकारी मदत घेऊन जिल्हा परिषद शाळेत येतो, हे मनाला सुखद धक्का देणारे चित्र आहे. राष्ट्राचे भवितव्य शाळेवर आधारलेले आहे. शाळेतून मुलांचे व समाजाचे उज्वल भविष्य घडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना श्रीकांत देशमुख म्हणाले की, मंदिरापेक्षा शाळांचा विकास साधण्याची गरज निर्माण झाली आहे. शाळेतून भविष्याची सक्षम पिढी घडणार आहे. शाळांवर लक्ष केंद्रित केल्यास समाजाची व देशाची प्रगती साधली जाणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन पंडित यांनी केले. आभार कौस्तुभ देशमुख यांनी मानले.