• Mon. Jun 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

पत्रकारांतर्फे महिपती महाराजांच्या दिंडीचे शहरात स्वागत

ByMirror

Jun 18, 2023

वारीसाठी आरोग्यमय शुभेच्छा देत, वारकर्‍यांना औषधी कीटचे वाटप

संतांचे चरित्र अभ्यासून महिपती महाराजांनी समता व माणवतेचा विचार -नाना महाराज गागरे

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- ताहाराबाद (ता. राहुरी) येथील संत कवी महिपती महाराज यांच्या दिंडीचे रविवारी (18 जून) मराठी पत्रकार परिषदेच्या पुढाकारातून सर्व पत्रकारांच्या वतीने शहरात स्वागत करण्यात आले. दिंडीतील वारकर्यांना वारीसाठी आरोग्यमय शुभेच्छा देत उपयुक्त औषधी कीटचे वितरण करण्यात आले. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल… श्री ज्ञानदेव तुकाराम च्या गजर करीत, रुसलेला वरुणराजा प्रसन्न होऊन दमदार बरसावा यासाठी वारकर्‍यांच्या उपस्थितीमध्ये पांडुरंग चरणी प्रार्थना करण्यात आली.


गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारांतर्फे वारकर्‍यांना उपयुक्त औषधांचे कीट वाटप करण्याचा उपक्रम सुरू आहे. या वर्षी संत कवी महिपती महाराज देवस्थानच्या दिंडीत हा उपक्रम राबविण्यात आला. नगर-मनमाड महामार्गावरील हुंडेकरी शोरूम समोर दिंडीचे स्वागत करुन वारकर्‍यांना औषधी कीटसह अल्पोपहाराचे वाटपही करण्यात आले. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस मन्सूरभाई शेख, माजी नगरसेवक अ‍ॅड. धनंजय जाधव, नगरसेविका सुप्रियाताई जाधव, सोमनाथ जाधव, विजयसिंह होलम, महेश महाराज देशपांडे, सूर्यकांत नेटके, बंडू पवार, संदीप कुलकर्णी, कायदेविषयक सल्लागार अ‍ॅड. शिवाजी कराळे, गोरक्षनाथ बांदल, अर्जुन राजापुरे, अमित आवारी, वाजिद शेख, नवीद शेख, उदय जोशी, अकीस सय्यद, अनिकेत गवळी, रमीज शेख, शब्बीर सय्यद, प्रवीण सुरवसे, सोमनाथ मैड, जी.एन. शेख आदींसह पत्रकार बांधव, वृत्त छायाचित्रकार व माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


दिंडीतील ह.भ.प. नाना महाराज गागरे, बालकृष्ण महाराज कांबळे, अर्जुन महाराज तनपुरे, दिंडी प्रमुख बाबासाहेब वाळुंज, सचिव बाळासाहेब मुसमाडे, विणेकरी बापूसाहेब गागरे, चोपदार राजू चव्हाण, सुधीर काकडे, रावसाहेब मिस्त्री, नाना शिरसाठ यांच्याकडे वारकर्‍यांसाठी आणलेले औषधी कीट उपस्थितांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आले.


ह.भ.प. नाना महाराज गागरे म्हणाले की, 288 संतांचे चरित्र अभ्यासून महिपती महाराजांनी समता व माणवतेचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविला. या भूमीतील संतांची खरी ओळख त्यांनी करून दिली. सामाजिक, समता व बंधुत्वाचा विचार घेऊन महिपती महाराजांची दिंडी आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाते. दिंडी सोहळ्याला तीनशे वर्षाची परंपरा आहे. ही दिंडी फक्त वारीसाठी जात नसून, येताना मोठ्या भक्तीभावाने पांडुरंगाला बरोबर घेऊन येते आणि गोपाल काळाचा उत्सव उत्साहात साजरा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.


अ‍ॅड. धनंजय जाधव यांनी अनेक वर्षांपासून शहरातील पत्रकार वारकरींची करीत असलेली सेवा कौतुकास्पद आहे. ऊन, वारा व पाऊसात वारीसाठी निघालेली वारी आरोग्यदायी होणार असल्याची आशा त्यांनी व्यक्त केली. मन्सूरभाई शेख यांनी दरवर्षी वारकर्‍यांना पत्रकारांच्या वतीने देण्यात येणारी आरोग्य सेवेची माहिती दिली. दिंडी प्रमुख बाबासाहेब वाळुंज यांनी सर्व पत्रकारांचे आभार मानले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *