शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याचा सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये निस्वार्थपणे योगदान दिल्याबद्दल प्रा. आबासाहेब नाथा यादव यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यशवंत सेना आणि जय मल्हार शैक्षणिक व सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने शहरातील माउली सभागृहात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी आमदार संग्राम जगताप, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश थोरात, जय असोसिएशनचे राज्याध्यक्ष अॅड. महेश शिंदे, यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय तमनर, संस्थेचे अध्यक्ष कांतीलाल जाडकर, लक्ष्मण मतकर, रावसाहेब काळे, योगेश खेंडके, ज्योती उनवणे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रात निस्वार्थपणे सामाजिक योगदान देणार्या व्यक्तींना जीवनगौरव व महिलांना हिरकणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रा. आबासाहेब यादव (ता. श्रीगोंदा) हे प्राध्यापक असून, गरजू घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत करत असतात. तर सामाजिक क्षेत्रातही त्यांचे कार्य सुरु आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.