दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा…. च्या निनादात विविध धार्मिक कार्यक्रम पार
दर्शनास भाविकांची गर्दी
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील नगर-पुणे महामार्गालगत असलेल्या 61 वर्ष जुने ओढ्यातील दत्त मंदिरात दत्ता महाराजांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. मंदिरात दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती.
पहाटे श्री दत्ता महाराज रुद्राभिषेकाचा विधी पार पडला. सकाळी 9 वाजता महादत्त यज्ञ सोहळा झाला. दुपारी 12 वाजता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा…. च्या निनादात नाम यज्ञ सोहळ्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी 6 वाजता श्री दत्ता महाराजाचा जन्मोत्सव सोहळा मंदिरात पार पडला. यानंतर भजन संध्येचा कार्यक्रमात भाविक मंत्रमुग्ध झाले. जन्मोत्सव सोहळानिमित्ताने मंदिरात आकर्षक फुलांची सजावट व परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यावेळी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे 61 वर्षा पूर्वी चास येथील माधवराव भोंग यांच्या स्वप्नात दत्ता महाराजांनी दर्शन दिले. तर सदर ठिकाणी सेवा व पारायण करण्यास सांगितले. मंदिरच्या मागील बाजूस असलेल्या उंबराच्या झाडा मधून दत्त महाराज यांच्या पादुका बाहेर आल्या. तेंव्हापासून त्या पादुकांची पूजा करण्यात येत आहे. हे मंदिर स्वयंभू असून या मंदिराची आख्यायिका संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द असल्याची माहिती मंदिराचे तिसऱ्या पिढीचे पूजारी शुभम रमेश भोंग यांनी दिली.
