वीर बाल दिवस व साहिबजाद्यांच्या शहिदीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांनी गुरुद्वारा परिसर भक्तिरसाने फुलले
जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांसह मान्यवरांची उपस्थिती; शीख समाजाच्या वतीने सन्मान
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील ऐतिहासिक गुरुद्वारा भाई दया सिंगजी, गोविंदपुरा येथे शनिवारी (दि. 27 डिसेंबर) श्री गुरु गोबिंदसिंहजी महाराज यांचा 359 वा प्रकाश गुरुपूरब (जयंती), वीर बाल दिवस तसेच साहिबजाद्यांच्या शहिदीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडले. या पावन सोहळ्यासाठी शीख, पंजाबी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘बोले सो निहाल, सत श्री अकाल’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर यावेळी दुमदुमला.

या पवित्र पर्वानिमित्त दि. 15 डिसेंबर रोजी सेहज पाठ साहिब यांचा शुभारंभ करण्यात आला होता. या सेहज पाठाची सांगता आज भक्तिभावाने करण्यात आली. दरम्यान 15 ते 27 डिसेंबर या कालावधीत संगतच्या सहभागातून दररोज चौपाई साहिब पाठ आयोजित करण्यात आले. तसेच दि. 23 व 24 डिसेंबर रोजी पहाटे प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीत भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता.
शुक्रवारी (दि. 26 डिसेंबर) वीर बाल दिवसानिमित्त विशेष कीर्तन समागम मोठ्या उत्साहात पार पडला. त्यानंतर शनिवारी श्री गुरु गोबिंदसिंहजी महाराजांचा प्रकाश गुरुपूरब गुरुद्वारा साहिबमध्ये अत्यंत भक्तिभावाने साजरा करण्यात आला. यावेळी हजुरी रागी जत्था भाई अमृतपाल सिंगजी व भाई हरदीप सिंगजी (फतेहगढ साहिब, पंजाब) यांच्या मधुर व भावस्पर्शी कीर्तनसेवेने संपूर्ण गुरुद्वारा परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
या धार्मिक सोहळ्याला जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, महापालिका आयुक्त यशवंत डांगे तसेच गुणे आयुर्वेद कॉलेज संस्थेचे अध्यक्ष सचिन जगताप यांनी गुरुद्वारास भेट देत दर्शन घेतले. त्यांनी शीख समाजबांधवांना प्रकाश गुरुपूरबच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी गुरुद्वारा व शीख-पंजाबी समाजाच्या वतीने या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमप्रसंगी शीख समाज व गुरुद्वारा भाई दया सिंगजीचे अध्यक्ष बलदेवसिंग वाही यांनी सर्व संगत, सेवादारांच्या व सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले. या संपूर्ण कालावधीत मोठ्या संख्येने भाविकांनी कीर्तन, कथा व लंगर सेवेत सहभाग घेतला.
दरम्यान, रविवारी (दि. 28 डिसेंबर) रोजी साहिबजाद्यांच्या शहिदीस अर्पण म्हणून विशेष कीर्तन व कथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुद्वारा भाई दया सिंगजी येथील सर्व सेवादारांच्या संयुक्त प्रयत्नातून हे सर्व धार्मिक कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व यशस्वीरीत्या पार पडले.
