बाराबाभळी येथील जामिया मुहम्मदिया मदरशाच्या वतीने गौरव
उल्लेखनीय परिश्रम आणि धार्मिक निष्ठेचे कौतुक
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ज्याने पवित्र कुराण आपल्या हृदयात स्थान दिले, त्याने जगातील ज्ञानाची सर्वात मोठी संपत्ती मिळवली! या उक्तीला सत्य ठरवत बाराबाभळी (ता. नगर) मदरसा येथील 13 वर्षीय हाफिज मुहम्मद सालेम इब्न अब्दुल अलीम यांनी अवघ्या 84 दिवसांत संपूर्ण पवित्र कुरान मुखोद्गत केले. शहराजवळील जामिया मुहम्मदिया मदरशा, जो जामिया इस्लामिया पब्लिकेशन उलूम (अक्कलकुवा) संस्थेची शाखा आहे, येथे विद्यार्थ्यांना धार्मिक व शैक्षणिक ज्ञान दिले जाते.
या संस्थेतील हाफिज मुहम्मद सालेम इब्न अब्दुल अलीम यांनी कुरान तोंडपाठ केल्याबद्दल मदरसाच्या वतीने त्याचा सन्मान करण्यात आला. तसेच हिफ्ज-ए-कुराण प्रमाणपत्र देऊन त्याला गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मदरशाचे प्रमुख कारी शादाब साहिब होते, तर प्रमुख अतिथी म्हणून उपप्रमुख मौलाना अन्वर साहिब, शिक्षण संचालक मुफ्ती इलियास साहिब, ग्रंथालय संचालक मौलाना हंझाला, मौलाना अब्दुल करीम साहिब, संवर्धन विभागाचे अध्यक्ष मौलाना अब्दुल हमीद साहिब तसेच नगर शहरातील विविध मदरशांमधील मौलाना व अभ्यासक उपस्थित होते.
मौलाना इलियास साहिब म्हणाले की, मुहम्मद सालेम हा अतिशय मेहनती, शिस्तप्रिय आणि बुद्धिमान विद्यार्थी आहे. रोजच्या अथक प्रयत्नांमुळे आणि अल्लाहवरील दृढ विश्वासामुळे त्याने ही विलक्षण कामगिरी केली. तो इतर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणास्थान असल्याचे त्यांनी सांगितले.
मदरशाचे प्रमुख कारी शादाब साहिब म्हणाले की, हाफिज मुहम्मद सालेम हा आमच्या जामिया मुहम्मदिया मदरशाचा अभिमान आहे. एवढ्या अल्प काळात संपूर्ण कुराण स्मरण करणे हे अतुलनीय यश आहे. त्याने कुशाग्र बुध्दीमत्तेच्या जोरावर हे साध्य केल्याचे स्पष्ट केले. सालेमचे वडील अब्दुल अलीम साहिब यांनी भावनिक शब्दांत सांगितले की, माझ्या मुलाने केवळ 84 दिवसांत संपूर्ण कुराण लक्षात ठेवले, याचा मला अभिमान आहे. हे यश अल्लाहची कृपा, शिक्षकांच्या मेहनतीचे आणि आमच्या प्रार्थनांचे फळ असल्याचे ते म्हणाले.
या कार्यक्रमात माजी उपमहापौर हाजी नजीर यांनी हाफिज मुहम्मद सालेमच्या या यशाने संपूर्ण समाजाचे नाव उज्वल केले आहे. त्याच्या गौरवाच्या निमित्ताने आम्ही त्याला उमराहसाठी (मक्का-मदीना दर्शन) पाठवू आणि त्याचा संपूर्ण खर्च आमच्या वतीने केला जाणार असल्याचे जाहीर केले.
हाफिज मुहम्मद सालेमच्या उल्लेखनीय परिश्रमांचे आणि धार्मिक निष्ठेचे सर्व उपस्थितांनी कौतुक केले. त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. तसेच जामिया मुहम्मदिया मदरशाच्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन करून, अशा तरुण विद्यार्थ्यांमुळे समाजात ज्ञान, श्रद्धा आणि कुराणाचे प्रेम वाढत असल्याचे मत व्यक्त केले.
